दिलासादायक : उत्तराखंडमध्ये अडकलेले पाळधीचे १५ भाविक सुरक्षित, ना.गुलाबराव पाटील म्हणाले..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे देशभरातील अनेक भाविक त्याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील १५ भाविक अडकल्याची माहिती होती. दरम्यान, त्या भाविकांशी संपर्क झाला असून सर्व सुखरुप असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री, गुलाबराव पाटील, यांनी एक मोठी आणि दिलासादायक बातमी दिली आहे. उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकल्याची भीती असलेले पाळधी गावातून गेलेले सर्व १५ पर्यटक सुरक्षित आहेत. गेल्या ३६ तासांपासून त्यांच्याशी संपर्क तुटला होता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, आता हे सर्वजण सुरक्षित असल्याची खात्री खुद्द मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
या सर्व पर्यटकांना गंगोत्रीपासून काही अंतरावर असलेल्या भारतीय लष्कराच्या बेस कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची काळजी घेतली जात आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याठिकाणी रस्ते वाहून गेल्याने सध्या कुणीही बाहेर पडू शकत नाही. तसेच नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात त्यांनी फोनवरून दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसात या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. यामुळे पर्यटकांच्या नातेवाईकांमध्ये पसरलेली काळजीची लाट आता शांत झाली असून, सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.