
हाजी डॉ. करीम सालार यांना ज्ञानमर्मी जीवनगौरव सन्मान
जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला योगदान दिलेल्यांच्या कार्याला ग्रामगौरव फाउंडेशनने दिला उजाळा
जळगाव प्रतिनिधी
ग्रामगौरव फाउंडेशनच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त येथील अल्पसंख्यांक समाजातील शिक्षणक्षेत्रातील अग्रणी तसेच जळगावचे माजी उपमहापौर हाजी डॉ. करीम सालार यांना ज्ञानमर्मी जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला.कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान झाला.
जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या महनीय व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाला उजाळा मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानमर्मी सन्मान सोहळ्याचे आयोजन होते.सर्व सन्मान झालेल्या शिक्षण पंढरीच्या वारकऱ्यांची प्रेरणागाथा म्हणून काढण्यात येणाऱ्या ‘ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे सुद्धा यावेळी अनावरण करण्यात आले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या देखण्या सोहळ्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा दूध संघांचे चेअरमन आ.मंगेशदादा चव्हाण,जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल सिंघेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण,जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,
सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष शरद जिवराम महाजन मधुस्नेह संस्था परिवाराचे धनंजय चौधरी,पाचोरा पीपल बँकेचे संचालक अँड. अविनाश भालेराव,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे,ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी,इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार, उद्योजक रवींद्र नवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
हाजी डॉ. करीम सालार यांनी प्रतिकूल काळात शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात आणि विशेष म्हणजे अल्पसंख्यांक समाजासाठी शिक्षणाची दालने उभारत केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध दिवंगत नामवंत व्यक्तीमत्व व विद्यमान अशा 29 शिक्षण संस्थाचालकांना सुद्धा ज्ञानमर्मी सन्मान प्रदान करण्यात आला.
अल्पसंख्यांक संस्थेला हिंदू समाजाने दिले बळ :
अभिनेता दिलीप कुमार यांच्या शोच्या माध्यमातून हिंदू समाजाच्या सत्तर टक्के आर्थिक पाठिंब्यामुळे माझ्या व माझ्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून इकराचे रोप 1980 मध्ये लावण्यात आले. आता ह्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.अनेक विद्यार्थी देश विदेशात विद्यालयातील , महाविद्यालयातुन मिळवलेल्या ज्ञान, कौशल्यांच्या बळावर रोजगारातून समाजसेवा करीत आहे. जळगाव मध्ये 1970 मध्ये उद्भवलेल्या मोठ्या धार्मिक दंगली नंतर इकरा तसेच इतर समाजातील शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द , सलोखा, सहिष्णुता तसेच राष्ट्रीय एकात्मता भक्कम होण्यास हातभार लागलेला आहे, असे सत्काराला उत्तर देतांना हाजी डॉ. करीम सालार यांनी नमूद केले.
ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे,सचिव सुभाष मराठे,क्रिएटिव्ह हेड वीरेंद्र पाटील,मंत्रालय ब्युरो चीफ रवींद्र चव्हाण, दिनेश दीक्षित फाउंडेशनच्या सचिव भाग्यश्री ठाकरे,दिनेश थोरात,सई नलवडे,विकास पाटील, बाळासाहेब पवार,प्रकाश पवार,दस्तगीर खाटीक, आकाश भंगाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.आनंद शर्मा व तुषार भामरे यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानमर्मी उपक्रमाच्या संयोजिका कु.धनश्री ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले,आभार सुनील गरुड यांनी मानले