जळगावात हिंदी साहित्य गंगातर्फे शनिवार, रविवार राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महाेत्सव
पद्मश्री भवरलाल जैन यांच्या स्मरणार्थ आयाेजन : राष्ट्रीय चर्चासत्र, बहुभाषिक कविसंमेलन रंगणार
जळगाव | शहरात हिंदी साहित्य गंगा संस्थेतर्फे शनिवार व रविवार असे दाेन दिवस दहावा राष्ट्रीय बहुभाषिक साहित्य महाेत्सव हाॅटेल रिगल पॅलेस येथे आयाेजित करण्यात आला आहे. सहा सत्रात राष्ट्रीय चर्चासत्र, कविसंमेलनासह विविध कार्यक्रम हाेतील. यंदाचा हा महाेत्सव स्वर्गीय पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन यांना समर्पित केला आहे.
महाेत्सवाचे उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. सुहास गाजरे भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार सुरेश भोळे, उद्योजक अशोक जैन, रजनीकांत कोठारी, नयनतारा बाफना आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ सत्रात मराठी, हिंदी, गुजराथी असे बहुभाषिक कवी संमेलन हाेईल. भारताच्या जम्मू काश्मीर ते कच्छ गुजरातपर्यंतचे साहित्यिक उपस्थित राहतील. पाचव्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी लाभणार आहे. दुसऱ्या दिवशी सहाव्या सत्रात गाैरव सोहळा आयोजित करण्यात आला अाहे. अध्यक्षस्थानी नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण देशमुख असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाजपच्या जळगाव महानगर अध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी महापाैर भारती सोनवणे, माजी महापौर सीमा भोळे व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महाेत्सवाला दलिचंद जैन यांचे सहकार्य लाभलेे आहे. महाेत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रियंका सोनी, इंदिरा जाधव, सुनिल पांडे, प्रकाश बारी, विशेष सहाय्य संरक्षक उमेश सोनी, मार्गदर्शक श्रीकांत तारे आणि इतर कार्यकारिणी सदस्य परिश्रम घेत आहेत. समाराेप सत्रात रविवारी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. त्यात देशभरातील विविध कला प्रकारांवर आधारीत निवडक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
*राष्ट्रीय चर्चासत्र रंगणार*
महाेत्सवात पहिल्या दिवशी अर्थात शनिवारी दुपारी १२.३० ते १.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय चर्चासत्र आयाेजित करण्यात आले आहे. त्यात ‘नवीन शैक्षणिक धाेरणात भारतीय भाषांची भूमिका’, ‘हिंदी साहित्यात ज्येष्ठांची भूमिका आणि सरकारचे धाेरण अशा विविध विषयांवर त्यात चर्चा व मंथन हाेईल. अध्यक्षस्थानी उज्जैन येथील डाॅ. प्रभू चाैधरी असतील.
*देशभरातील साहित्यिक येणार*
बहुभाषिक साहित्य महाेत्सवाला जम्मू, काश्मिर, उत्तराखंड, दिल्ली, मुंबई, भाेपाळ, इंदूर, पंजाब अशा विविध ठिकाणाहून ६५ दिग्गज साहित्यिक येणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील ५० साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गुजराथी, उर्दू भाषेत लेखन करणारे कवी, लेखक, कादंबरीकार हे देखील हजेरी लावणार आहेत. सहभागी सर्व साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदी साहित्य गंगा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डाॅ. प्रियंका साेनी यांनी दिली आहे.