खळबळजनक : जळगावातील उच्चभ्रू व्यावसायिकाच्या हवाल्याचे ७ कोटी रुपये लुटले?

महा पोलीस न्यूज | २२ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यातील मुसळी फाट्याजवळ झालेल्या लुटीतील मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात सापडत नसताना आणखी एक लूट झाल्याची चर्चा सुरू आहे. जळगाव शहरातील काही बड्या व्यावसायिकांचे पैसे हवाला मार्फत एक उच्चभ्रू व्यावसायिक मुंबई येथे पाठवले जात असताना शहापूर परिसरात लुटण्यात आल्याची दबक्या आवाजात कुजबूज सुरू आहे. मुख्य म्हणजे रक्कम ७ कोटीच्या जवळपास असल्याची माहिती असून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे समजते.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मुसळी फाट्याजवळ गेल्या महिन्यात एका कापूस व्यापाऱ्याचे दीड कोटी लुटण्यात आले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक करून ४८ लाख रुपये हस्तगत केले आहेत. गुन्ह्यातील ४ मुख्य आरोपी अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात हवाल्याचा व्यवहार जोरदार असून अनेकदा लुटीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी पाळधीजवळ एका व्यापाऱ्याचा खून देखील झाला होता. जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवणारी एक कुजबूज सध्या जोरात सुरू असून आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर हवालाची मोठी रक्कम लुटण्यात आल्याची चर्चा आहे.
चर्चेनुसार, जळगाव शहरातील ५-६ बडे उद्योजक आणि व्यावसायिकांची जवळपास ७ कोटी हवालाची रक्कम मुंबई येथे पोहचविण्याची जबाबदारी एका उच्चभ्रू सराफ व्यावसायिकाने घेतली होती. दि.१५ रोजी एका बोलेरो वाहनात कुरिअरचे १२ पार्सल होते. चालक आणि क्लिनर दोघेच मुंबईच्या दिशेने निघाले होते. शहापूर खर्डी गावालगत गोपाळकृष्ण ढाब्याच्या पुढे इनोव्हा वाहनात आलेल्या ७-८ दरोडेखोरांनी बोलेरो वाहनाला अडवून शस्त्रांचा धाक दाखवला. पुढे काही मीटर अंतरावर एका बंद कंपनीच्या मागे दोघांना घेऊन जात वाहनातील ४ पार्सल गोणीमध्ये असलेली रक्कम काढून घेत रिकामे बॉक्स पुन्हा परत वाहनात ठेवून त्यांनी पळ काढला.
शहापूरजवळ घडलेल्या घटनेची जळगाव शहरात आणि विशेषतः सराफ बाजारात कमालीची कुजबुज आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसला तरी संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे. घडलेल्या घटनेची आम्ही कोणतीही पुष्टी करीत नसून याबाबत जोरदार चर्चा आहे.