नवी दिल्ली वृत्तसंस्था जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये लष्कराचे वाहन साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जवान जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुंछ भागातल्या नियंत्रण रेषेजवळ लष्कराचे वाहन कोसळल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचं एक वाहन तब्बल ३०० फूट खोल दरीमध्ये कोसळलं. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलिस आणि लष्करी जवान अपघात स्थळी दाखल झाले.
११ मद्रास लाइट इन्फंट्री (11 MLI) चे वाहन निलम मुख्यालय ते बालनोई घोरा पोस्टकडे जात असताना हा अपघात झाला. वाहन गंतव्यस्थानाजवळील दरीत अंदाजे ३५० फूट खाली कोसळले. अपघाताची माहिती मिळताच ११ एमएलआयच्या क्विक रिॲक्शन टीमने बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमी जवानांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली असून त्यांना उपचारांसाठी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मृत जवानांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.