
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनात सध्या अस्थिर वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडींनी प्रत्येक पोलिसाच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना सकारात्मक मार्गदर्शनाचा डोस आवश्यक आहे. विविध चर्चा, गुन्हेगारांशी संपर्क, व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांना घराची वाट बघावी लागत असून यामागे पोलीसदलातील बीट, जळाऊ वृत्ती, जुने वाद आणि ‘कलेक्शन’ची स्पर्धा कारणीभूत आहे. काही वर्षापूर्वी याच वृत्तीतून पोलिसच एकमेकांचे ट्रॅप लावत होते मात्र सध्या चित्र काहीसे वेगळे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सर्वच विभागात पोलीस दल नेहमीच चर्चेत असतो. पोलीस प्रशासनाला ग्लॅमर जास्त असल्याने कुठेही काहीही झाले तरी त्याचा संबंध पोलिसांशी जोडला जातो. सर्व विभागांची नाळ पोलीस दलाशी जुळलेली असल्याने त्या विभागाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार न पाडल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला पोलिसांनाच सामोरे जावे लागते. तेव्हा सर्व खापर पोलिसांवर फुटते.
आपसातील स्पर्धा घेतेय बळी
पोलीसदलात देखील पोलिसांमध्ये स्पर्धा असते. पोलिसांमध्ये तपासासाठी स्पर्धा असायला हवी मात्र ती स्पर्धा कमी आणि इतरच स्पर्धा जास्त असते. आपसात असलेले वाद, साहेबाच्या जवळीकमुळे वाढणारी जळाऊ वृत्ती, बीट आणि कलेक्शन मिळवण्यासाठी चाललेली चढाओढ दुसऱ्या कर्मचाऱ्याचा बळी घेण्यासाठी कारणीभूत ठरतो. पोलिसांमध्ये सुरु असलेली ही स्पर्धा काही नवीन नाही. काही वर्षापूर्वी अशाच स्पर्धेतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्फत ट्रॅप लावला जात होता. सध्या ती पद्धत वापरली जात नसली तरी नवीन पद्धत वापरली जाते आहे. आपल्याला ज्याचा काटा काढायचा आहे त्याचा एखादा व्हिडीओ काढायचा आणि वरिष्ठांना पाठवायचा किंवा मिडिया प्रतिनिधींपर्यंत पोहचवला जातो. पुढे छोटीशी मीडिया ट्रायल होते आणि त्याची विकेट पडते.
प्रत्येक पोलीस चुकतोच पण..
पोलीस दल असा विभाग आहे कि त्यात काम करताना प्रत्येक पोलिसाकडून केव्हा ना केव्हा चुका होतातच. पोलिसांवर हफ्तेखोरीचे जाहीर आरोप होतात आणि त्यात तथ्य देखील असते मात्र त्याचा अर्थ असा नाही कि पोलीस सर्वाधिक हफ्तेखोर असतात. पोलिसांना गुन्हे शोधासाठी काही खबरी आणि गुन्हेगारांशी देखील संबंध ठेवावे लागतात. गुन्हेगारांशी किती जवळीक वाढवावी याला देखील पोलिसांनी स्वतः मर्यादा आखणे आवश्यक आहे. जुने आणि वरिष्ठ पोलीस देखील गुन्हेगारांशी संबंध ठेवायचे मात्र ते वेळ आल्यावर त्यांना पोलिसी खाक्या देखील दाखवायचे. आताचे पोलीस गुन्हेगारांसोबत बैठक करतात. चिरीमिरी करण्यात पोलिसांचा हातखंडा असतो पण सध्या प्रत्येकावर तिसऱ्या डोळ्याची आणि मोबाईलच्या कॅमेऱ्याची नजर असतेच हेच ते विसरतात. पोलिसांच्या हातून होणाऱ्या काही चुकांकडे दुर्लक्ष करायला हवे कारण ते देखील जनतेसाठी स्वतःच्या कुटुंब आणि शरीराची काळजी न घेता दिवसरात्र मेहनत घेत असतात.
महिन्याभरात अनेक कर्मचाऱ्यांचा गेला बळी
जळगाव जिल्ह्यात महिन्याभरात अर्धा डझनपेक्षा अधिक पोलिसांवर कारवाई झालेली आहे. भडगाव येथे वाहन चालकाला ५० रुपये मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तिघांचे निलंबन झाले. जळगाव शहर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर त्यांचे निलंबन झाले. वाहतूक शाखेतील तिघांची काही कारणावरून बदली करण्यात आली. एका दुकानदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघांचे निलंबन करण्यात आले. ड्रग्स पेडलरशी संपर्क ठेवल्याने एलसीबीच्या एका उपनिरीक्षकाचे निलंबन झाले. जवळपास ११ पोलिसांवर गेल्या महिन्याभरात कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या विचारांना रिफ्रेशमेंट कोण देणार?
पोलीस प्रशासनातील आजवरच्या अनेक घटना आणि आरोप प्रत्यारोप लक्षात घेतले असता अनेक पोलिसांवर कारवाई झाली आणि अनेकांना वाचवण्यात देखील आले. सध्याच्या काळात देखील बऱ्याच पोलिसांना वाचविण्याचा प्रयत्न झाला पण काहींची विकेट पडलीच. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या कारवायांमुळे संपूर्ण पोलीस अधिकारी आणि कर्मचारी भीतीच्या सावटाखाली आहे. कधी ना कधी काही ना काही कामानिमित्त पोलिसांचा गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्याशी संबंध आलेला आहे. सध्या जे वातावरण सुरु आहे त्यामुळे ‘मेरा नंबर तो नही आयेगा’ असा प्रश्न कायम त्यांच्या मनाची धाकधूक वाढवत असतो. पोलिसांना सध्या आपुलकीचा हात आणि धीर देत त्यांच्या मनातील विचारांना रिफ्रेशमेंट करणे गरजेचे आहे.