लातूरात भूकंपाचे सौम्य धक्के: रिश्टर स्केलवर 2.3 तीव्रता

लातूरात भूकंपाचे सौम्य धक्के:
रिश्टर स्केलवर 2.3 तीव्रता
लातूर प्रतिनिधी I मुरुड अकोला परिसरात मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री ८:१३ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. रिश्टर स्केलवर २.३ तीव्रतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिमेला मुरुड अकोला येथे होता. भूकंपाची खोली ५ किलोमीटर असल्याची नोंद झाली आहे. सौम्य धक्क्यांमुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही, तरीही बाहेर पावसाने हैदोस घातलेल्या वातावरणात या भूकंपाने लातूरकरांना दुहेरी संकटात टाकले.
भूकंपाचे धक्के जाणवताच मुरुडमधील रहिवाशांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. पावसामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या नागरिकांना भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी चिंता वाढवली. प्रशासनाने तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे प्रशासनाने सांगितले.






