जळगावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधमाला ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा!

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव येथील एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस कॉलनी/सुप्रीम कॉलनी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी अर्शद रब्बी पटेल याला न्यायालयाने ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असतानाच, न्यायालयाच्या या निर्णयाने पीडितेला न्याय मिळाला आहे.
१५ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास, ६ वर्ष ८ महिने वयाची पीडित मुलगी आपल्या लहान भावासह घरासमोर अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपी अर्शद रब्बी पटेल (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) तिथे आला. त्याने पीडितेला १० रुपये देण्याचे आमिष दाखवून एका रिकाम्या खोलीत नेले. तेथे त्याने पीडित मुलीला जमिनीवर झोपवून तिच्या छातीला हात लावून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
पीडिता प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत आपल्या आईला रडत-रडत हाक मारत होती. तिचा आवाज ऐकून तिची आई आणि इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
या प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात फिर्यादी आणि पीडितेची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. आरोपीतर्फे लेखी युक्तिवाद आणि काही वरिष्ठ न्यायालयांचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले. यावर सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सौ. अनुराधा लक्ष्मण वाणी यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद केला.
त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “१०० आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये हे जरी कायद्याचे तत्व असले तरी, एक अट्टल गुन्हेगार सुटल्यास त्याचे सामाजिक परिणाम दुर्गामी आणि भयंकर होतात. अशा प्रकारची मनोविकृत मानसिकता व समाज विघातक वृत्ती ही समाजाला लागलेली कीड आहे, ज्याने सामाजिक असुरक्षितता व असमतोल निर्माण होतो.”
अनुराधा लक्ष्मण वाणी यांच्या प्रभावी युक्तिवादावर विचार करून, अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. भांगडीया-झवर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
पोक्सो कलम ७ व ८ अन्वये: आरोपीस ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ७,०००/- रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ४ महिने साधा कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
भारतीय दंड संहिता (भा.द.वि.) कलम ३५४ अन्वये: आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि ३,०००/- रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली सुरेश महाजन, पैरवी अधिकारी श्री. मनोज गालफाडे आणि श्री. सपकाळे यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले. या निर्णयानंतर समाजातून समाधान व्यक्त होत आहे.