PoliticsSocial

ग. स. सोसायटीच्या भरतीवरील स्थगिती उठवली

ग. स. सोसायटीच्या भरतीवरील स्थगिती उठवली

माहिती समाधानकारक ठरल्याचा शेरा; आजपासून मुलाखती

जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीच्या नोकरभरतीवरून निर्माण झालेल्या वादानंतर घातलेली स्थगिती अवघ्या चोवीस तासांत उठवण्यात आल्याने जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे. दि. १८ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले होते; मात्र संस्थेने मागविलेल्या पाच मुद्द्यांवरील माहिती सादर करताच ती समाधानकारक असल्याचा शेरा नोंदवत स्थगिती उठवण्यात आली असून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, आज शनिवार दि. २० पासून या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

गस सोसायटीच्या या भरतीबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तीव्र चर्चा सुरू होती. ऑनलाईन अर्ज मागवून लेखी परीक्षा न घेता केवळ तोंडी परीक्षेच्या आधारे भरती करण्याचा प्रयत्न असल्याचे आरोप झाले होते. यावरून शिवसेना (शिंदे गट)चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही भरती रद्द करावी अथवा नामांकित एजन्सीकडून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधकांनी तात्पुरती स्थगिती दिली होती.

पाच मुद्द्यांवर स्पष्टीकरण सादर

भरतीसाठी प्रस्ताव सादर करताना सभासद संख्या, सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्त पदे आदी पाच मुद्द्यांवरील सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश संस्थेला देण्यात आले होते. त्यानुसार गस सोसायटीने आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर केली असून ती समाधानकारक असल्याचे नमूद करत भरतीवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. भरती ज्या टप्प्यावर थांबवली होती, त्याच टप्प्यापासून पुढे सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लेखी की तोंडी परीक्षेबाबत संभ्रम

या भरतीत केवळ तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याने आर्थिक उलाढालीच्या चर्चांना उधाण आले होते. संचालक मंडळाने सहकार विभागाच्या पत्राचा आधार घेतल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात लेखी परीक्षा होणार की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रम कायम आहे.

२,६०० अर्ज; ६६ पदे

या भरती प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला असून लिपिक पदासाठी १,४८७ तर शिपाई पदासाठी १,११३ असे एकूण सुमारे २,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ६६ पदे भरली जाणार असून आजपासून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, स्थगिती दिल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी ती उठवण्यात आल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना तोंड फुटले आहे. संचालक मंडळाने ‘सूत्रे हलवून’ ही स्थगिती उठवली, अशी दबक्या आवाजातील चर्चा सुरू असून गस सोसायटीच्या भरती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button