समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी – संदीप घोरपडे

समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी – संदीप घोरपडे
जळगाव (प्रतिनिधी) :समाजाचे अधःपतन वाढत असून गरीब-श्रीमंतातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढणे ही गंभीर बाब असून लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजाला आरसा दाखविण्याची निर्भीड भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन संदीप घोरपडे यांनी केले. मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय बापू पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर व सुधीर भटकर यांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
घोरपडे यांनी मनरेगा योजनेतील बदलते स्वरूप, सामाजिक विषमता, माध्यमांची जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण या विषयांवर सखोल भाष्य केले. भाषणाच्या समारोपात त्यांनी पत्रकार भवनाच्या दुरुस्तीसाठी ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी जाहीर केली.
प्रास्ताविकात विजय पाटील यांनी पत्रकार संघाची वाटचाल, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिका, सन्मान योजना तसेच हीरक महोत्सवानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास वाणी यांनी केले, उपस्थितांचे आभार अशोक भाटीया यांनी मानले, तर पसायदान भागवत पाटील यांनी सादर केले. कार्यक्रमास कमलाकर वाणी, अनंत वाणी यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरएल हॉस्पिटल, रेडक्रॉस सोसायटी, मुक्ती फाउंडेशन, सारंग भाटीया, रजनीश राणे, तेजमल जैन, विश्वासराव भोसले, मुकुंद गोसावी, नितीन धांडे आदींनी परिश्रम घेतले.
पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर
कार्यक्रमापूर्वी जिल्हा पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यानुसार
पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रमोद अण्णा पाटील, ग्रामीण अध्यक्ष भिका भाऊ चौधरी, महानगर अध्यक्ष विवेक खडसे, कार्याध्यक्ष पांडुरंग महाले, सरचिटणीस दिलीप शिरुडे यांची निवड करण्यात आली.
भवन समिती अध्यक्षपदी दिपक नगरे (रावेर), सचिव सारंग भाटिया, जिल्हा संघटक मोतीलाल जोगी, खजिनदार फारुख शेख यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून प्रा. राजेंद्र देशमुख, देविदास वाणी, सचिन सोमवंशी, भरत चौधरी (धरणगाव), राजेश यावलकर, सुरेश पाटील (यावल) व चरणसिंग पाटील यांची निवड झाली. सहचिटणीसपदी डॉ. नलीन महाजन व अरुण मोरे यांची जबाबदारी देण्यात आली.
छायाचित्रकार संघाच्या अध्यक्षपदी गोकुळ सोनार, एरंडोल तालुका अध्यक्षपदी बी. एस. चौधरी, तर जामनेर तालुका अध्यक्षपदी तेजमल जैन यांची निवड जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाची कार्यकारिणी व भवन समितीची उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.






