Crime

धक्कादायक : ८ वर्षीय चिमुकलीच्या पायात ७ महिने राहिली बंदुकीची गोळी!

जळगावच्या मोहाडी गावातील प्रकार : सात महिन्यांनंतर खुलासा, सिव्हिलचा हलगर्जीपणा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील मोहाडी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका ८ वर्षीय मुलीच्या पायात बंदुकीची गोळी आढळून आली असून तब्बल सात महिन्यांनी हा प्रकार समोर आला आहे. अंगणात खेळताना गोळी लागली होती. ही घटना त्या वेळी लक्षात न आल्याने नुकतीच खासगी रुग्णालयातील तपासणीत उघड झाली. या प्रकरणी पोलिस चौकशी करत असून, गोळी कोणी आणि का चालवली याबाबत मुलीचे कुटुंबीय आणि मुलगी स्वतः अनभिज्ञ असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी गावातील ८ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत अंगणात खेळत होती. त्यावेळी तिच्या पायाला (घोट्याजवळ) दुखापत झाली. कुटुंबीयांनी तातडीने तिला स्थानिक रुग्णालयात नेले, जिथून तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी जखमेवर टाके घालून तात्पुरता उपचार केला आणि मुलीला घरी सोडले.

सात महिन्यांनंतर प्रकार उघड
सात महिन्यांनंतर तिच्या पायात पुन्हा वेदना सुरू झाल्या आणि बोटे काळी पडू लागली. यामुळे कुटुंबीयांनी तिला जळगावातील भास्कर मार्केट परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत पायात पिस्तूलची गोळी असल्याचे आढळले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात प्राथमिक चौकशी करण्यात आली.

कुटुंबीय आणि मुलगी स्वतः अनभिज्ञ
मुलीच्या पालकांनी आणि मुलीने त्या दिवशी नेमके काय घडले याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले की, ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने कुटुंबीयांना तिथे पाठवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.

सिव्हील हॉस्पिटलच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह
या घटनेने सिव्हील हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुलीला पहिल्यांदा सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेले असता, तिथे योग्य तपासणी झाली असती तर ही गोळी तेव्हाच आढळली असती. मात्र, तात्पुरत्या उपचारांमुळे हा प्रकार सात महिन्यांनंतर उघड झाला. यामुळे मुलीच्या जीवाशी खेळ झाल्याची टीका होत आहे. तसेच, या प्रकरणात गोळी चालवण्याचा गुन्हा लपवला गेल्याची शक्यताही पोलिस तपासत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button