Detection

जळगाव शहर पोलिसांची दमदार कामगिरी : घरफोडी करणारे अट्टल चोरटे जेरबंद, दोन गुन्ह्यांची उकल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत तीन अट्टल चोरट्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्ह्यात घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी विशेष पथकाची स्थापना करून तपासाला गती दिली.

दोघांचे नाव केले निष्पन्न
दरम्यान, दि.२३ ते २५ मार्च दरम्यान गेंदालाल मिल परिसरातील शेख रईस शेख यांच्या घरात घरफोडी होऊन सुमारे १० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२६ दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आदिल शेख मजीद, गुफरान शेख करीम आणि कासिम सैय्यद अली (सर्व रा.गेंदालाल मिल, जळगाव) हे सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

दोन गुन्ह्यांची उकल
पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून १० हजार रुपये रोख रक्कम, ११.९७० ग्रॅम वजनाच्या ४ चांदीच्या अंगठ्या, ९७.८१० ग्रॅम वजनाचे ३ चांदीचे पैंजण तसेच १.९७० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी आणखी एका घरफोडी गुन्ह्याची कबुली दिल्याने जळगाव शहर पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, सुनिल पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, विरेंद्र शिंदे, योगेश पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, दीपक शिरसाठ, अमोल ठाकूर, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button