
देवमाणूस” असल्याचे सांगत वृद्धाची सोन्याची अंगठी गंडवली ; जळगाव शहरातील घटना
जळगाव | प्रतिनिधी – मनोकामना पूर्ण होईल, असे सांगत देवमाणूस असल्याचा दावा करणाऱ्या अनोळखी व्यक्तींनी ७२ वर्षीय वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास केली. ही घटना १ जून रोजी घाणेकर चौकात घडली असून, या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश पंढरीनाथ भोळे (वय ७२, रा. माऊली नगर) हे वृद्ध घाणेकर चौकात केळी विकणाऱ्या हातगाडीजवळ उभे होते. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन आश्रमाचा पत्ता विचारू लागली. थोड्याच वेळात दुसरी व्यक्तीही तेथे आली आणि वृद्धाशी बोलू लागली.
या दोघांपैकी पहिल्याने स्वतःला “देवमाणूस” असल्याचे सांगून भोळे यांना हातात दगड ठेवण्यास सांगितले आणि तो व्यक्ती मंदिराजवळ निघून गेला. दुसऱ्या व्यक्तीने वृद्धाला त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्या दगडाचा रुद्राक्ष झाल्याचे दाखवले. त्यानंतर त्यांनी वृद्धाच्या बोटातील सोन्याची अंगठी शंभराच्या नोटेत गुंडाळून पिशवीत ठेवण्यास सांगितले.
पुढे या व्यक्तींनी अंगठीची पुडी पिशवीत ठेवली असल्याचे भासवून वृद्धाला मागे न पाहता निघून जाण्यास सांगितले. काही अंतरावर गेल्यानंतर भोळे यांनी पुडी तपासली असता, अंगठी व नोट काहीच नसल्याचे लक्षात आले. मागे पाहताच दोघेही व्यक्ती पसार झाले होते.
या प्रकाराने वृद्धाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.