धुपी येथे शेतकऱ्याच्या घरातून ५७ हजारांची चोरी

अमळनेर (पंकज शेटे) – शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले ५७ हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून चोरून नेल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धुपी येथे ७ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी ३० जून रोजी शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी बँकेतून ५७ हजार ५०० रुपये काढले होते. त्यांनी हे पैसे घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. त्याच दिवशी ते नाशिकला गेले होते. घराला कुलूप लावून घराची किल्ली गावातीलच दिलीप माधवराव देसले यांच्याकडे दिली होती.
७ जुलै रोजी देसले हे लाईट सुरू करण्यासाठी घरात गेले असता, घराच्या दरवाज्याचे कुलूप व कडीकोंडा तोडलेले आढळले. त्यांनी तातडीने जाधव यांना फोन करून माहिती दिली. जाधव घरी आल्यानंतर त्यांनी पाहिले असता, लोखंडी कपाटातील लॉकर फोडून त्यातील रोख रक्कम गायब असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.






