Politics

जळगाव महापालिका निवडणूक तयारीला सुरुवात; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग रचना समिती गठीत

जळगाव महापालिका निवडणूक तयारीला सुरुवात; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग रचना समिती गठीत

प्रभाग रचना २०११ च्या जनगणनेच्या आधारे; गुगल मॅपद्वारे नकाशे सादर करण्याचे निर्देश

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीत उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगर रचनाकार अमोल पाटील, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, शहर अभियंता आर. टी. पाटील, शाखा अभियंता योगेश वाणी आणि संगणक तज्ञ पियुष पाटील यांचा समावेश आहे.

राज्याचे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी सर्व महापालिकांना २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगाव महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू केले असून नगर रचना विभागाने यासंबंधी प्रारंभिक टप्प्यावर कार्यवाही सुरू केली आहे. अद्याप शासनाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे २०१८ मधील निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचनेचे आरंभिक प्रारूप तयार केले जात आहे.

गुगल मॅपवर आधारित सादरीकरणाची अट
शासनाने प्रभाग रचना सादर करताना गुगल अर्थचा वापर करून विशिष्ट पद्धतीने नकाशे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगात, तर प्रभागांच्या सीमा निळ्या रंगात दर्शवाव्यात, तसेच नवीन प्रभागांच्या हद्दी लाल रंगात दाखवाव्यात, असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक प्रगणक गटाचा क्रमांक, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या नकाशाच्या लेजेंडमध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यस्तरीय बैठक
गुरुवारी सकाळी ११ वाजता प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीपूर्व तयारी, प्रभाग रचना प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणी यावर चर्चा झाली.

सध्या तरी प्रभागांची संख्या व सीमांमध्ये बदल होईल की नाही, हे स्पष्ट नाही. मात्र शासनाच्या पुढील मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button