मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य

मतदानासाठी भरपगारी सुट्टी अनिवार्य
नियम मोडणाऱ्या आस्थापनांवर होणार कठोर कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक क्षेत्रातील सर्व कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुट्टी नाकारणाऱ्या आस्थापनांविरोधात तक्रार प्राप्त होताच तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जळगाव जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ च्या कलम १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना सहाय्यक कामगार आयुक्त डॉ. रा. दे. गुन्हाने यांनी सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना हे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामध्ये खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, तसेच खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जे कर्मचारी कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत आहेत, मात्र त्यांचे नाव जळगावच्या मतदार यादीत आहे, त्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी देणे बंधनकारक असेल.
अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये जिथे पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नियोक्त्यांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १० डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाची कठोर अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाणार आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी सर्व आस्थापनांनी सहकार्य करावे आणि नियमांचे उल्लंघन टाळावे, असे आवाहन कामगार आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.






