SpecialCrime

अवैध धंदे बंद : पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपण..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याचे चित्र गेल्या पंधरवाड्यापासून दिसून येत आहे. विशेष म्हणजे शहरातील अवैध धंदे बंद असल्याने ते प्रभावीपणे दिसून येते. जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे, पोलिसांची हफ्तेखोरी याची जाहीर चर्चा अधिवेशनात आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडून झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासन चांगलेच बदनाम झाले. सर्व काही होऊन गेल्यानंतर अवैध धंदे बंदच्या सूचना म्हणजे पोलिसांना उशिरा सुचलेले शहाणपणच म्हणावे लागेल.

जळगाव जिल्हा गेल्या काही वर्षात अवैध धंद्यांचे माहेरघर होऊन बसले आहे. जिल्ह्यात पोलिसांच्या संगनमताने आणि परवानगीनेच अवैध धंदे सुरु असल्याने पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. जळगावात अवैध धंदे काही आजपासून नाही तर वर्षानुवर्षे सुरु आहेत मात्र गेल्या काही महिन्यात त्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. गल्लोगल्ली, जागोजागी अवैध धंदे सुरु झाले होते. पोलिसांनी अनेकदा कारवाया केल्या मात्र त्या केवळ दाखवण्यासाठी होत्या, त्यामुळेच अवैध धंदे चालकांचे फावले झाले.

पोलीस अधीक्षकांच्या सूचना, धंदेवाले शॉक
जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत आजवर केवळ माजी विरोधी पक्षनेते आ.एकनाथराव खडसे हेच जाहीरपणे बोलत होते मात्र गेल्या वर्षभरातील चर्चा पहिल्या तर सत्ताधारी आमदारच अवैध धंदे, ड्रग्स, हफ्तेखोरी यावर बोलू लागले आहे. ड्रग्सचा मुद्दा तर अधिवेशनात देखील गाजला होता. तत्पूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी तर पोलिसांच्या हफ्तेखोरीची यादीच जाहीर केली होती. जिल्ह्यातील पोलीस दलातील प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत असल्याचे पाहून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईच्या सूचना केल्या आहे.

अवैध धंदे खरंच बंद?
जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून अवैध धंदे बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध धंदे बंद असतांनाच पोलीस अचानक सक्रिय झाले असून ठिकठिकाणी छापे टाकून कारवाया करीत आहे, हे मात्र विशेष. जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे बंद असल्याचे बोलले जात असले तर त्यात सत्यता नाही. जळगाव उपविभाग, मुक्ताईनगर, पहूर, पाचोरा, भुसावळ परिसरात काही ठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. अवैध धंदे पोलिसांच्या आशिर्वादाशिवाय सुरु असणे अशक्य आहे.

फक्त तेच धंदे बंद का?
अवैध धंदे पूर्णतः बंदच्या सूचना असल्या तरी वाळू चोरी, गुटखा, हवाला, रमी, मोबाईल सट्टा, गांजा, भांग, ड्रग्स विक्री, अवैध लाकूड वाहतूक, गावठी दारू, अवैध प्रवासी वाहतूक, रेशनचा काळाबाजार, कुंटनखाने हे मात्र बिनधास्त सुरु आहेत. स्थानिक पोलीस ठाणे प्रभारी आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे आशिर्वादाने हे सर्व सुरु आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button