जळगाव एलसीबीची नवीन टीम चमकली : लाखोंचा गुटखा जप्त, दोघांना अटक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत मुक्ताईनगर येथे १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा गुटखा साठा वाहनासह जप्त केला आहे. एलसीबीत गेल्याच महिन्यात नव्याने आलेल्या टीमने पहिल्यांदा मोठी कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना ३ सप्टेंबर २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की, मुक्ताईनगर परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतुक होणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रतन गिते, मयूर निकम आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत पाटील यांचा समावेश होता.
नाकाबंदी करून गुटखा पकडला
पोलीस पथकाने अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, जळगाव आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर येथील सारोळा फाटा येथे नाकाबंदी केली. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले. तपासणीदरम्यान, वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पथकाने वाहनासह एकूण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोघांना अटक, इतरांचा शोध सुरू
या प्रकरणी आशिष राजकुमार जयस्वाल, रा.भमोरी, वार्ड क्रमांक १४, देवास, मध्यप्रदेश आणि आशिफ खान बुल्ला खान, रा.शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपूर, महाराष्ट्र या दोघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींची चौकशी करून अवैध वाहतुकीच्या मागील साखळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
संपूर्ण कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परता आणि नियोजनबद्ध कारवाईद्वारे अवैध गुटखा वाहतुकीला आळा घालण्यात यश मिळवले आहे.
मुख्य म्होरक्या गवसणार?
जप्त केलेला मुद्देमाल आणि वाहन यांचा तपास अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाने सुरू आहे. तसेच, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पथक कार्यरत आहे.






