ब्रेकिंग : करन पवार जळगाव मतदार संघातून शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार
महा पोलीस न्यूज | ३ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातून पारोळा येथील करन पवार हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी मुंबईत केली आहे.
जळगावचे खा.उन्मेष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्यासोबत पारोळा येथील करन पवार यांनी देखील प्रवेश केला. प्रवेशानंतर मुंबईत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खा.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली.
पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे म्हणाले की, शिवसेना धक्का खाणारी नसून जेव्हा शिवसेना धक्का देते तेव्हा तो झटका असतो. राजकारणात बदल आवश्यक असतो. आम्ही जनतेसाठी लढतो आहे. आमच्याकडे इनकमिंग वाढणार आहे. पक्षातील निष्ठावान, पक्ष बांधणीसाठी लढलेल्या पदाधिकाऱ्यांना फेकून देण्याचे काम भाजपत सुरू आहे. उन्मेष पाटील आणि करन पवारांनी केले ते बंड आहे आमच्याकडे झाले ते गद्दारी होती. जळगावची जागा अगोदर आमच्या मित्र पक्षाकडे होती. आता आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत, असे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी काही उमेदवार जाहीर केले. त्यात कल्याण – डोंबवली येथून वैशाली दरेकर, हात कणांगले येथून सत्यजित आबा, पालघर येथून भारती कामडी तर जळगावातून करन पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.