Crime

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या!

जळगाव: शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरू असतानाच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. काशिनाथ चौक परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

जळगाव तालुक्यातील धानोरा खुर्द येथील रहिवासी शालिक पाटील हे काशिनाथ चौक भागात काही कामासाठी आले होते. त्यांनी आपली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी (MH 19 AK 0207) पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपून परतले असता त्यांना आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी असा लावला छडा

एमआयडीसी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि यावल पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी संशयावरून आतिष जितेंद्र पोथीवाल (रा. कांचन नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार गणेश लक्ष्मण कोळी (रा. साकेगाव, ता. भुसावळ) याच्या मदतीने ही दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

आरोपींना पोलीस कोठडी

पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपास पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितिन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी आणि योगेश घुगे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button