मालेगावहून चोरलेला डंपर जळगाव एमआयडीसी पोलिसांनी पकडला
महा पोलीस न्यूज । दि.१४ डिसेंबर २०२४ । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून एक डंपर चोरी करण्यात आला होता. डंपर जळगाव शहरात आल्याची माहिती मिळताच गुप्त माहिती काढून आणि तांत्रिक माहितीच्या आधारे जळगाव एमआयडीसी पोलिसांनी डंपर शोधला आहे. फातेमा नगरातून पोलिसांनी डंपर हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलिस स्टेशन यांचेकडील गु.र.न.716/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील फिर्यादी ऋषिकेश महारू मोरे यांच्या मालकीचा ११ लाख रुपये किमतीचा डंपर क्रमांक एमएच.१५.डीके.९७५३ हा लोनवाडे येथून दि.११ रोजी चोरी झाला होता.
डंपर जळगावच्या दिशेने आला असल्याने एमआयडीसी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने पाहणी करीत असता डंपर हा एमआयडीसी परिसरात गेल्याचे दिसून आले. सतत दोन दिवस संपूर्ण परिसर शोधून काढत असताना दि.१३ रोजी डंपर हा फातेमा नगर परिसरात निर्जन स्थळी उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी डंपर पंचनामा कारवाई करून ताब्यात घेऊन मालेगाव तालुका पोलिस स्टेशनशी संपर्क करून त्यांचा ताब्यात दिला आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, कर्मचारी विशाल कोळी, राहुल रगडे, योगेश बारी अशांनी केली आहे.