एमआयडीसी पोलीस ठाण्यातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर साहेब मेहेरबान!

महा पोलीस न्यूज | २४ मार्च २०२४ | जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे नेहमीच चर्चेत असते. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्यावर चार दिवसापूर्वी एका अवैध धंदे चालकाकडून गंभीर आरोप करण्यात आले. संपूर्ण प्रकरण साहेबांच्या कानी पडले तरी साहेब त्या कर्मचाऱ्यावर मेहेरबान असून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही किंवा काहीही हालचाली झाल्या नसल्याची चर्चा आहे. दोन वर्षापूर्वी देखील असेच एका कर्मचाऱ्यावर आरोप झाले होते, तेव्हा देखील साहेबांनी त्याला सांभाळले होते. सध्या तोच कित्ता गिरवला जात असल्याचे दिसून येत आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याची हद्द सर्वात मोठी असून गुन्हेगार देखील जास्त आहे. एमआयडीसी पोलिसांची कामगिरी चांगली असली तरी अवैध धंद्याची संख्या देखील सर्वाधिक आहे. सट्टा, पत्ता, जुगार तर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असून जवळपास सर्वांचेच राजकीय लागेबांधे आहेत. हद्द मोठी आणि अवैध धंदे जास्त असल्याने कलेक्शनच्या स्पर्धेतून पोलीस कर्मचारीच कर्मचाऱ्यांच्या विरोधात बातम्या पेरू लागले आहेत. काही कर्मचाऱ्यांचे अवैध धंदे चालक, मालकांशी घनिष्ठ संबंध असल्याने कारवाई देखील टळली जाते. हद्दीतील अवैध धंदे चालकांची मुजोरी इतकी वाढली असून ते थेट पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव घेत हफ्तेखोरीचा आरोप लावत आहेत.
दोन वर्षापूर्वी देखील साहेबांच्या नावे पैसे मागितल्याचा आरोप करीत एक सट्टापेढी चालक थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात पोहचला होता मात्र वेळीच एलसीबी आणि इतर काही दिग्गज पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तो विषय पोलीस अधिक्षकांपर्यंत पोहचला नव्हता. अवैध धंदे चालकाला हफ्ता मागितल्याच्या प्रकारातून हे सर्व घडल्यानंतरही प्रभारी अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली नाही शिवाय कलेक्शनची खिरापत देखील सुरूच राहू दिली. गेल्यावर्षी सबंधित कर्मचाऱ्याची बदली झाली होती मात्र त्यातही त्याने जुगाड लावत मुदतवाढ मिळवली.
नुकतेच पुन्हा त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली असून एका सट्टापेढी चालकाने एका कर्मचाऱ्यावर हफ्तेखोरीचा आरोप केला आहे. इतकंच नव्हे तर संबंधित कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचेही त्याने म्हटले आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांनी पोलीस प्रशासनाची प्रतिमा खराब होत असून ते कर्मचारी मात्र कॉलर उचकावून फिरत आहेत. एखाद्या पोलीस ठाण्यात नवीन प्रभारी अधिकारी आल्यावर त्याला खुश करण्यासाठी कर्मचारी आपला प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच अशा घटना घडत असतात. आपल्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने त्या कर्मचाऱ्यांचे देखील फावले होत असते.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी अशीच एका प्रकारात दोन कर्मचाऱ्यांना बदलीचा झटका मिळाला मात्र दुसऱ्या दोन कर्मचाऱ्यांना आहे ते काम सांभाळण्याची शाबासकी मिळत आहे. नूतन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कामातून पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीचा दणका दाखवला असल्याने पोलीस कर्मचारी काहीशे शिस्तीत आले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही सामाजिक कार्यकर्ते तक्रार करण्याच्या तयारीत असून त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा आणखी मलीन होण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी अवैध धंद्याच्या बाबतीत आपली कठोर भूमिका अगोदरच स्पष्ट केली असून गुन्हे शोध कामगिरीवर भर दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असून त्यात अवैधधंदे चालकांच्या आरोपाची आणि मारहाणीच्या आरोपाची पडताळणी झाली तर निवडणूक अधिकाऱ्यांचे देखील याकडे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. अवैध धंदे चालक, मालकांकडे वेळीच लक्ष न वेधल्यास रक्तपात विरहित निवडणूक घोषणेला ऐन निवडणूक काळात ती घोषणा मोडली जाईल अशी शक्यता आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांची कृपादृष्टी असल्याने डीबीत असंतोष वाढत असून ‘हे राम’ म्हणायची वेळ आली आहे. सर्व असेच सुरू राहिले तर ‘साई’ सेवा साहेबांना पावेल की चौकशीअंती कारवाईचा बडगा उगारला जाईल हे येत्या काही दिवसात सर्वांना कळेल.