Midnight Breaking : कायद्याचे रक्षक बारमध्ये नशेत! जळगाव पोलिसांचा डान्स बार व्हिडिओ व्हायरल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । मुंबईतील एका डान्स बारमध्ये बसून मद्यप्राशन करत बारबालांचा डान्स पाहत असलेल्या जळगाव एलसीबी शाखेतील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक व्हिडिओ महा पोलीस न्यूजच्या हाती लागल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये किमान तीन पोलीस कर्मचारी स्पष्टपणे दिसून येत असून, त्यापैकी एक कर्मचारी जळगाव एलसीबी शाखेतील असल्याचे ठामपणे ओळखू येत आहे. मात्र उर्वरित दोन कर्मचारी नेमके कोणत्या शाखेतील आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, संबंधित पोलीस कर्मचारी मुंबईत तपास कामानिमित्त गेले होते की खासगी कारणासाठी, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, कायद्याचे रक्षण करणारेच जर अशा प्रकारे डान्स बारमध्ये मद्यप्राशन करताना आढळून आले, तर सामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.
या प्रकरणामुळे पोलीस शिस्त, नैतिकता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची दखल घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या व्हायरल व्हिडिओनंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई होते की प्रकरणावर पडदा टाकला जातो, याकडे लक्ष लागले आहे.
व्हिडिओ कुणी, कधी शूट केला आणि कुणी व्हायरल केला हे देखील अद्याप समोर आलेले नाही.





