महिलादिनी पोलिसांच्या ‘नेत्रम’ने महिलेच्या चेहऱ्यावर फुलविले हसू!
महा पोलीस न्यूज | ९ मार्च २०२४ | जागतिक महिला दिन म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच असतो. देशभरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन सुरू असताना जळगाव शहरात मात्र एक महिला अश्रू वाहत होती. जळगावात आल्यावर रिक्षात बॅग विसरल्याने महिलेला रडू कोसळले होते. कुणीतरी भल्या माणसाने महिलेला जळगाव जिल्हा पोलिसांच्या नेत्रम कक्षाची माहिती दिली. नेत्रम गाठले आणि अर्ध्या तासात महिलेला पोलिसांच्या मदतीने बॅग परत मिळाली.
जळगाव पोलीसदलाकडे २०२२ पर्यंत केवळ ५६ सीसीटिव्ही कॅमेरे होते. तद्नंतर लोकसहभागातून कॅमेरे घेऊन ते त्याच दात्यांच्या प्रभागात लावण्यात आल्याने बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारीवर वचक बसण्यास मदत झाली. आज पोलीसदलाकडे जवळपास २०० उच्चप्रतिचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणखी ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून लवकरच ते कार्यान्वित होऊन गुन्हेगारीला चांगलीच चपराक बसेल, शिवाय पोलिसांनी देखील मदत होईल.
रिक्षात विसरले होते बॅग
महिलादिनी जळगावात पोलिसांच्या मदतीमुळे एका महिलेला मोठी मदत झाली आहे. कासोदा येथील एक महिला शुक्रवारी ११.३० वाजेच्या सुमारास बसने जळगावात आली. जळगाव बसस्थानकावर उतरल्यावर महिला रिक्षाने टॉवर चौकात आली. महिला घाई गडबडीत रिक्षातून उतरली मात्र स्वतःची बॅग रिक्षातच विसरली. काही मिनिटात तिला बॅग विसरल्याचे लक्षात आले मात्र रिक्षा चालक दिसेनासा झाला होता. महिलेने जवळपास विचारणा केली मात्र उपयोग झाला नाही. जिल्हा पोलीस प्रशासनाने मुख्य चौकात सीसीटिव्ही कॅमेरे बसविले असून ते पोलीस मुख्यालयात तपासता येतील असे महिलेला कुणीतरी सांगितले.
रिक्षा चालकाचा सुरू झाला शोध
महिला पुन्हा रिक्षाने नवीन बसस्थानकात पोहचली. रिक्षा चालकाबाबत विचारणा केली मात्र काहीच तपास न लागल्याने महिलेला रडू कोसळले. पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने त्यांना नेत्रम कक्षाची माहिती दिली. शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्यासह नेत्रम कक्षातील कर्मचारी दीपक महाजन, कुंदनसिंग बायस यांनी टॉवर चौक आणि बसस्थानक परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासून रिक्षाचालकाचा शोध घेतला. ओळख पटल्यावर माहिती घेतली असता तो चालक नवीन बसस्थानक परिसरात असतो असे कळले.
नेत्रममुळे लागला शोध
नेत्रम कक्षातून सीसीटिव्ही कॅमेऱ्यात लक्ष ठेवले असता काही वेळात संबंधित रिक्षा चालक बस स्थानकाबाहेर आला. महिलेसोबत जाऊन पोलिसांनी विचारणा केली असता रिक्षा चालक गोपाळ आप्पा जाधव रा.कुसुंबा यांनी बॅग महिलेला परत केली. बॅग व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळून ठेवलेली होती. बॅग हातात येताच महिलेच्या आनंदाला पारा उरला नाही. वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी रिक्षा चालक गोपाळ जाधव यांना बक्षीस दिले तर महिलेने पोलीस प्रशासन आणि चालकाचे आभार मानले. महिलादिनी जळगाव जिल्हा पोलिसांच्या मदतीने महिलेच्या चेहऱ्यावर हसू परतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.