
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार या बदल्या होणार असून तत्पूर्वीच पोलीस दलात मोठी उत्सुकता आणि काही प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आतापासूनच आपल्या राजकीय संपर्कांचा वापर करून सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी बदली प्रक्रियेत किती कठोर भूमिका घेतात आणि काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच बदल्यांची यादी जाहीर होण्याची शक्यता असून, त्यानंतर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल दिसून येतील.
राज्जयातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना सुरुवात झाली आहे. गृह विभागात आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात होणार आहे. दरवर्षी पोलीस दलात नियमितपणे बदल्या होतात. जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बदल्यांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. प्रशासकीय कारणांनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार या बदल्या केल्या जाणार आहेत.
बदलीपूर्वीच अनेकांनी लावली राजकारण्यांच्या दरबारात हजेरी
काही कर्मचाऱ्यांनी आपल्या राजकीय ‘ओळख’ आणि ‘वशिला’ वापरून मनापसंत पोलीस स्टेशन मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी स्थानिक राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या बदलीसाठी शिफारशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बदलीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच वातावरण चांगलेच तापले आहे. कोणत्या पोलीस स्टेशनला कोणाची वर्णी लागते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बदलीसाठी साहेब बोलावणार कि..
दरम्यान, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना ज्या कुणाचा कार्यकाळ संपलेला आहे त्यांची थेट दुसऱ्या ठिकाणी बदली करणार कि पसंती आणि अडचणी विचारून त्याठिकाणी बदली देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बदली होणार इतकेच सध्या माहिती असल्याने अनेकांच्या मनाची धाकधूक वाढली आहे. काही अधिकाऱ्यांची पदोन्नती होणार असून काहींची जिल्ह्याबाहेर बदली होणार आहे, त्यामुळे त्याठिकाणी देखील आपली वर्णी लागावी म्हणून फिल्डिंग लावणे सुरु आहे.
कही ख़ुशी, कही गम
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गेल्या वर्षी जवळपास प्रत्येक कर्मचाऱ्याला मनपसंत ठिकाणी बदली देण्याचा प्रयत्न केला होता. काहींचे एकाच पोलीस ठाण्यात अनेक वर्ष नोकरी झाल्याने त्यांना इतरत्र बदली देण्यात आली होती. बदलीमध्ये काही कर्मचारी नाराज देखील झाले होते. तर काहींनी राजकीय जुगाड वापरून देखील त्यांचे प्रयत्न असफल ठरले होते. एकंदरीत कही ख़ुशी, कही गम असा माहोल होता. यंदा देखील बदल्यांची प्रक्रिया नियमानुसार, पारदर्शकपणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता पार पडली तर पुन्हा एकदा तेच वातावरण दिसेल.