ब्रेकिंग : जळगाव पोलीस दलात फेरबदल; तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवार दि.३१ जानेवारी रोजी तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश निर्गमित केले आहेत. यामध्ये दोन पोलीस निरीक्षक आणि एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) मधील तरतुदींनुसार, पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पोनि. अरविंद विनायक भोळे बोदवड पोलीस ठाणे यांची मानवी संसाधन विकास शाखा, जळगाव, सपोनि. दिपक दिलीप सुरवाडकर जळगाव शहर पोलीस ठाणे यांची प्रभारी अधिकारी, बोदवड पोलीस ठाणे तसेच पोनि. प्रदिप खंडु ठाकुर जिल्हापेठ पोलीस ठाणे यांची नियंत्रण कक्ष, जळगाव याठिकाणी बदली करण्यात आली आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोनि. प्रदिप ठाकूर यांची बदली नियंत्रण कक्षात झाल्यामुळे, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत सपोनि. अनिल लोटन वाघ (एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील प्रलंबित गुन्हे, अर्ज आणि शासकीय दस्तऐवज संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवून तत्काळ नवीन ठिकाणी हजर व्हावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासकीय निकड आणि जनहितार्थ हे बदल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळवले आहे.





