जळगाव सराफ बाजार दरोडा : आरोपी पोलिसांच्या टप्प्यात, पुण्यात एक ताब्यात
महा पोलीस न्यूज | २१ मे २०२४ | जळगाव शहरातील सराफ बाजार तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. सोमवारी घटना उघडकीस येताच वेगवेगळ्या पोलीस टीम तपासाला लागल्या आणि संशयित आरोपी टप्प्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्यांपैकी एकाला पुणे येथून ताब्यात घेतले असून इतर आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील सराफ बाजारात भवानी मंदिराशेजारी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन दुचाकीवरुन आलेल्या सहा दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी २५ लाख ४७ हजारांचे सोन्याचे दागिने, ६ लाख ५० हजारांची चांदीचे दागिने व ३२ हजारांची रोकड असा एकूण ३२ लाख २९ हजार ५७४ रुपयांचा ऐवज घेवून दरोडेखोर पसार झाले होते. याप्रकरणी सौरभ कोठारी यांनी माहिती दिली होती.
सराफ बाजारातील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांची मिटींग घेवून त्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, शनिपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. तसेच इतर पोलीस ठाण्यातील पथक देखील शोध घेत होते.
माहितीच्या आधारे रवाना झालेल्या पथकाला दरोड्यातील एक संशयित पुण्यात असल्याची माहिती मिळताच त्यांनी पुण्यातून एका संशयिताला ताब्यात घेतले. तसेच अन्य दोन जणांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीनंतर मोठी टोळी अटकेत येऊन अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.