विवाहितेने लहान मुलीस गळफास देऊन स्वतः संपविले जीवन..
जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर येथील घटना, घटनेमुळे परिसरात खळबळ
जळगाव– एका 36वर्षीय विवाहित्याने आपल्या आठ वर्षीय मुलीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी तसेच खळबळजनक घटना आज रविवार 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनाली दीपक दाभाडे वय 36 आणि तेजस्विनी दीपक दाभाडे वय 8 अशी मयत आई आणि मुलीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की हरी विठ्ठल नगर परिसरात राहणाऱ्या दीपक दाभाडे हे व्यावसायिक असून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची व दोन भावांची तीन मजली इमारत असून ते या इमारतीमध्ये राहतात. दीपक दाभाडे हे त्यांचे भुसावळ येथील नातेवाईक वारल्यामुळे ते आज 24 रोजी भुसावळ येथे गेले असता घरी त्यांची पत्नी सोनाली दाभाडे आणि मुलगी तेजस्विनी या दोघी घरी एकटाच होत्या. सोनाली दाभाडे यांनी मुलगी तेजस्विनी हिचा स्कार्फने गळफास देऊन स्वतः देखील दुसऱ्या स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मात्र भुसावळ येथून दुपारी बारा वाजेच्या सुमारास आलेल्या दीपक दाभाडे यांच्या ही घटना लक्षात आली. तिसऱ्या मजल्यावर घराचा आतून दरवाजा बंद होता . त्यांनी धक्का मारून आत शिरल्यावर त्यांना दोघांचे मृतदेह दिसल्याने त्यांनी एकच आक्रोश केला. दोघं मायलेकींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.