लग्नाआधीच तरुणाने आयुष्य संपवले! : कारण अस्पष्ट

लग्नाआधीच तरुणाने आयुष्य संपवले! : कारण अस्पष्ट
तांबापुरा परिसरातील घटना, परिसरात हळहळ
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात आत्महत्येच्या घटनांनी चिंतेचा विषय निर्माण केला असतानाच तांबापुरा परिसरात आणखी एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. नवाज सादिक सय्यद (वय २४) या युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, ९ जुलै रोजी उघडकीस आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
नवाज सय्यद हा बिलाल चौक परिसरातील महादेव मंदिराजवळ आई-वडील आणि तीन भावांसोबत राहत होता. त्यांचे दोन घरे असून आठ जुलैच्या रात्री तो दुसऱ्या घरी झोपायला गेला होता. आज सकाळी वडील सादिक सय्यद हे त्याला उठवण्यासाठी गेले असता, नवाजने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लगेचच नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयात व परिसरात नातेवाईक व मित्रांचा आक्रोश पाहायला मिळाला.
विशेष बाब म्हणजे, नवाजचा विवाह अवघ्या दोन महिन्यांनंतर होणार होता. तो अत्यंत शांत, मनमिळावू आणि सहृदय स्वभावाचा असल्याचे त्याचे मित्र व परिचित सांगतात. मात्र, त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, यामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.
एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.