कर्तव्यापलीकडे माणुसकी : वाहतूक पोलिसांनी वेडसर तरुणीला दिला आधार!
बस स्थानकासमोर रस्त्यावर झोपली तरुणी, उसाचा रस पाजून सुरक्षित घरी पोहोचवले

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पोलीस म्हणजे केवळ कायदा अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून, गरज पडल्यास माणुसकीचा हात पुढे करणारे संवेदनशील चेहरेही असतात, याचा प्रत्यय आज जळगावात आला. नवीन बस स्थानकसमोर मुख्य रस्त्यावर झोपून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वेडसर तरुणीची समजूत काढून पोलिसांनी तिला ऊसाचा रस पाजत सुरक्षित घरी रवाना केले.
आज दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर बस स्थानकाजवळ वाहतूक नियमन करत असताना पोलीस हवालदार विजय इंगळे आणि महेश विसपुते यांच्यासमोर एक अनपेक्षित प्रसंग उभा राहिला. अचानक एक मानसिक अस्थिर तरुणी मुख्य रस्त्यावर येऊन झोपली आणि “मला घरी सोडा” अशी आर्त हाक देत रडू लागली.
या घटनेमुळे बस स्थानकातून येणाऱ्या बसेस आणि मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती गंभीर होत असतानाही दोन्ही पोलिसांनी संयम आणि समजूतदारपणाचा परिचय देत त्या तरुणीला दोन वेळा समजावून रस्त्याच्या कडेला नेले. मात्र, ती पुन्हा रस्त्यावर येऊन झोपत असल्याने प्रसंग अधिकच गुंतागुंतीचा बनला.
अशा वेळी कठोर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी माणुसकीचा मार्ग निवडला. त्यांनी त्या तरुणीशी प्रेमाने संवाद साधत तिची विचारपूस केली, तिला उसाचा रस पाजून शांत केले आणि तिच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी असलेले रिक्षा चालक अर्शद शेख यांनी देखील सहकार्य केले.
मोबाईलवरून संवाद आणि चेहऱ्यावर हास्य
थोड्याच वेळात तरुणीने आपला पत्ता सांगितला आणि ती दवाखान्यातून आल्याची माहिती दिली. यावेळी महा परिवहन विभागाचे कर्मचारी गोपाळ पाटील हे तिच्या ओळखीचे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला. मोबाईलवरून संवाद घडवून आणल्यानंतर काही वेळातच गोपाळ पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांना पाहताच त्या तरुणीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि ती त्यांच्यासोबत शांतपणे निघून गेली.
कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य
नेहमीच टीकेचा धनी ठरणाऱ्या पोलीस यंत्रणेचा आजचा हा माणुसकीचा चेहरा मात्र प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन एका असहाय्य तरुणीला दिलेला हा आधार खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.






