विशेष वाहन तपासणी मोहिमेत जिल्ह्यात धडक कारवाई

विशेष वाहन तपासणी मोहिमेत जिल्ह्यात धडक कारवाई
११०० हून अधिक वाहनांवर कारवाई; १३ लाख ७१ हजार ४५० रुपयांचा दंड
जळगाव प्रतिनिधी I महा पोलीस न्यूज जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे तसेच गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे बुधवारी (दि. २४ डिसेंबर २०२५) संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ११०६ वाहनांवर धडक कारवाई करत तब्बल १३ लाख ७१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी स्वतंत्र पथके नेमून प्रमुख चौक, महामार्ग व गर्दीच्या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली.
या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट अथवा फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने तसेच अल्पवयीन वाहन चालक यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. कारवाईदरम्यान नंबर प्लेट नसलेल्या किंवा नियमबाह्य प्लेट वापरणाऱ्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करत ४ लाख ४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहने देऊ नयेत, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
याशिवाय इतर मोटार वाहन कायद्यान्वये ५३६ प्रकरणांमध्ये कारवाई करत ५ लाख २१ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रभावी कामगिरी केली.
जिल्ह्यात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.






