
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पाळधी ते तरसोद राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य रस्त्याची पाहणी
जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सकाळी पाळधी ते तरसोद दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या बाह्य रस्त्याची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महामार्गाच्या बाजूने जाणाऱ्या या बाह्य रस्त्याची सध्याची परिस्थिती, रस्त्यावरील अडथळे, रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज आणि भविष्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेली कामे यांचा आढावा मंत्री पाटील यांनी घेतला. नागरिकांना आणि वाहनचालकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्ती आणि विकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
रस्त्याच्या कामांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषण आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत सखोल चर्चा झाली. येत्या काही दिवसांत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक निधी आणि कामांचे नियोजन करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.






