जळगाव जिल्ह्यात पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, कृत्रिम टंचाई व साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई

जळगाव जिल्ह्यात पाच कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, कृत्रिम टंचाई व साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई
जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरुवात होताच खतांच्या कृत्रिम टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपलब्ध साठा असूनही शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा न केल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने कृषी विभागाने तपासणी मोहीम राबवत कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी (दि. ९) झालेल्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच कृषी केंद्र चालकांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांमध्ये विविध प्रकारच्या अनियमितता आणि गैरप्रकार आढळून आले. यामध्ये चोपडा तालुक्यातील दोन, चाळीसगाव, बोदवड आणि भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका कृषी केंद्राचा समावेश आहे.
तपासणीदरम्यान काही कृषी केंद्र चालकांनी खताचा साठा असतानाही शेतकऱ्यांना पुरवठा न करता कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचे आढळून आले. काहींनी विनापरवाना गोदामात अनधिकृतरित्या खत व बियाण्यांचा साठा करून ठेवला होता.
दरम्यान, जळगाव शहरातील एका नर्सरीमध्ये देखील तपासणी करण्यात आली असून, या ठिकाणी बियाणे व औषधांच्या साठ्यावर संशय निर्माण झाला आहे. सदर नर्सरी परवानाधारकाविरोधात सुनावणी सुरु असून, पहिल्या सुनावणीस तो अनुपस्थित राहिल्यामुळे पुढील सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार आहे.
तसेच चोपडा तालुक्यात एका व्यक्तीने विनापरवाना खत व बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मिळणाऱ्या तक्रारींनुसार कृषी विभागाची तपासणी मोहीम सुरुच असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. याशिवाय आणखी तीन प्रकरणांमध्ये सुनावणी सुरु असून, सुनावणीनंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दिली.