जामनेरात अवैध दारू विक्री विरुद्ध ‘वॉश आऊट’ मोहीम, लाखोंचा मुद्देमाल खाक
महा पोलीस न्यूज | २६ मार्च २०२४ | जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जामनेर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. पंधरा दिवसात जामनेर पोलिसांनी तब्बल २९ गुन्हे दाखल करीत ७ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईसाठी वेळ मिळत नसला तरी परवानाधारक मद्य विक्रेत्यांकडे चौकशा करायला मात्र मुबलक वेळ आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आपले कर्तव्य चोख बजावत नसल्याने पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस ठाणे निरीक्षक किरण शिंदे यांनी तालुक्यात विशेष मोहीम राबवली. पंधरा दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.