जयश्रीताईंच्या हाताला बळकटी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी बांधली मोट; शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला मोठा प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील निवडणुकीचा जाहीर प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. शहराच्या विविध भागात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचार सुरु असून, त्यांना जळगावकरांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
आज (दि.१७) प्रभाग क्रमांक ८ मध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्यांचे मनोभावे दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याचा प्रारंभ केला. त्यानंतर निमखेडी गाव, वैष्णवी पार्क, द्वारका नगर, गिरणाई कॉलनी, हिरा गौरी पार्क, वाटिकाश्रम आदी भागातून नागरिकांच्या भेटी घेत, त्यांच्याशी संवाद साधत इंद्रनील सोसायटी येथे प्रचार दौऱ्याची समाप्ती झाली. जयश्री महाजन यांच्या प्रचाराला शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी साथ लाभली.
जयश्री महाजन यांनी या प्रचार रॅलीत जनतेशी संवाद साधताना शहर विकासाची आपली भूमिका स्पष्ट करत, प्रगतीशील जळगावचे आपले व्हिजन जळगावकरांसमोर मांडले. प्रचार रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सांगितले की, जळगावकर नागरिकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद हा माझ्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देणारा आहे. जळगावात परिवर्तन होणार आणि मशाल पेटणारच आहे, हे मला आता जळगावकरांच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत आहे.”
प्रभाग क्रमांक ८ मधील राहिवाशांच्या समस्या जाणून घेताना जयश्री महाजन यांनी त्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले. तसेच जळगाव शहराला भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहीन, असे त्यांनी नमूद केले. जयश्री महाजन यांच्या प्रचाराची सुरुवात जितक्या जोरदार पद्धतीने झाली होती. त्याच जोशाने आता प्रचार शेवटच्या टप्प्यातही सुरु आहे. जळगाव शहर मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येत आहे.
जयश्रीताईंच्या प्रचार रॅलीला यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत निर्धार व्यक्त केला असून, नियोजनातील लहान-सहान गोष्टींवर काम करत, शेवटच्या टप्प्यातील प्रचारात प्रत्येक जळगावकरांना संपर्क साधण्याचा संकल्प त्यांनी केला. यावेळी जयश्री महाजन यांच्यासोबत प्रचार मोहिमेत सहभागी झालेल्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व समर्थकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.