यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश ; केळीला फक्त ४०० रुपये क्विंटल भाव, वाहतुकीचाही बोजा शेतकऱ्यांवरच

यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश ; केळीला फक्त ४०० रुपये क्विंटल भाव, वाहतुकीचाही बोजा शेतकऱ्यांवरच
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. बाजारात केळीला मिळणारा दर हा शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल ठरणारा नाही. केळीचे दर अवघे ४०० रुपये प्रति क्विंटल लागले आहेत, त्यातही संपूर्ण गाडी व्यापाऱ्यांकडून फक्त या भावातच घेतली जात आहे.
यात सर्वात मोठा आघात म्हणजे वाहतुकीचा खर्चसुद्धा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे. प्रत्येक झाडामागे तब्बल २० रुपये वाहतूक खर्च निघतो, यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. पाणी, खत, औषधे, मजुरी या सगळ्या खर्चानंतर एवढ्या कमी दरात केळी विकावी लागत असल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
“एकीकडे उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढतोय, खतं-औषधं महाग होत आहेत, मजुरी वाढली आहे. पण बाजारात केळीला दर मात्र पडतच चालला आहे. सरकारकडून आधारभाव किंवा सबसिडी मिळाली नाही तर पुढच्या हंगामात केळीचं पीक घेणं अशक्य होईल.”
यावल तालुका हा राज्यातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध भाग आहे. इथून देशभर केळी जात असते. परंतु योग्य बाजारभाव न मिळाल्यास शेतकरी निराश होत असून भविष्यात या पिकाकडून पाठ फिरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांची मागणी :
केळीला हमीभाव मिळावा.
वाहतुकीसाठी अनुदान द्यावे.
व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीवर नियंत्रण आणावे.
शेतकऱ्यांच्या या व्यथेला शासन व प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देऊन योग्य तो निर्णय घेतला नाही, तर यावल तालुक्यातील हजारो केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडतील, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.






