जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात स्काफ पथकाचे बाह्य मूल्यांकन

जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात स्काफ पथकाचे बाह्य मूल्यांकन
गुणवाढीसह शाळेच्या श्रेणीत सकारात्मक बदल
जळगाव (प्रतिनिधी) : खडके येथील जिजामाई प्राथमिक विद्यामंदिरात सोमवार दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी स्काफ पथकाने बाह्य मूल्यांकनासाठी भेट दिली. या भेटीप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पथकाचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या परिपाठाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली.
यानंतर स्काफ पथक प्रमुख व सदस्य, शाळेतील शिक्षकवर्ग यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध क्षेत्रे, मानके व स्तर याविषयी सविस्तर चर्चा करून पथक प्रमुखांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पथकाने वर्गांना भेट देत अध्यापनाचे निरीक्षण केले व शिक्षकांशी सविस्तर संवाद साधला. विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात घेतलेल्या मुलाखतींना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पथकाने शालेय परिसराचीही पाहणी केली. यामध्ये शाळेतील झाडे, बगीचा, परसबाग, स्वच्छता, मैदान, शौचालय, किचन शेड तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयींची तपासणी करण्यात आली. सर्व बाबींची सखोल पाहणी केल्यानंतर शाळेचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले.
बाह्य मूल्यांकनातील विविध मानकांनुसार आवश्यक पुरावे व अभिलेखांची पडताळणी करून काही निकषांमध्ये गुणांची वाढ करण्यात आली. यामुळे एकूण गुणसंख्येत वाढ होऊन शाळेच्या श्रेणीतही सकारात्मक बदल झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
या बाह्य मूल्यांकनाचे कामकाज स्काफ पथक प्रमुख म्हणून साकेगाव येथील केंद्रप्रमुख सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखाली विजय देवरे, अजय चालसे व राहुल पाटील यांनी पाहिले. जिजामाई प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक संजय रविंद्र साखरे यांच्यासह शिक्षक ज्ञानदेव पाटील, निलेश महाजन व सौ. निलिमा फेगडे यांनी पथकाचे स्वागत केले. तसेच शाळा मूल्यांकनासाठी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल संपूर्ण स्काफ पथकाचे आभार व्यक्त केले.






