जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ क मधून धीरज सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग ६ ड मधून धीरज सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण तापले असून अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेले विद्यमान नगरसेवक धीरज सोनवणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग क्रमांक ६ चे विद्यमान नगरसेवक धीरज मुरलीधर सोनवणे यांना यंदा भाजपने उमेदवारी दिली नाही. धीरज सोनवणे यांचा प्रभागातील जनसंपर्क, केलेली विकासकामे या सर्व जमेच्या बाजू असताना देखील धीरज सोनवणे यांची उमेदवारी डावलण्यात आली. प्रभागातील समर्थकांची मागणी आणि दमदार उमेदवार असल्याने लागलीच धीरज सोनवणे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गाठले.
धीरज मुरलीधर सोनवणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक ६ क मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना जनतेचा चांगला पाठिंबा मिळाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना धीरज सोनवणे यांनी विकास, पारदर्शक कारभार, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, महिलांचे प्रश्न तसेच युवकांच्या संधी या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. “जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या महापालिकेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे आणि सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून आमचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीचे प्रतिनिधी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रभाग ६ क मध्ये निवडणुकीची रंगत वाढली असून पुढील काळात प्रचार अधिक वेग घेण्याची शक्यता आहे.






