भुसावळ DySP पदी केदार बारबोले, संदीप गावित यांना पदोन्नतीचे वेध

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । राज्याच्या गृह विभागाने पोलीस दलात फेरबदल करण्यास सुरुवात केली असून, जळगाव जिल्ह्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भुसावळ उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी (DySP) केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले बारबोले आता भुसावळची सूत्रे हाती घेणार आहेत. गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्याचा अनुभव ही जमेची बाजू
नवनियुक्त अधिकारी केदार बारबोले यांच्यासाठी जळगाव जिल्हा नवा नाही. २०२४ मध्ये त्यांनी याच जिल्ह्यात आपले परिविक्षाधीन प्रशिक्षण (Probationary Period) पूर्ण केले आहे. या काळात त्यांनी स्थानिक गुन्हेगारी आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याने, भुसावळ सारख्या महत्त्वाच्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांना या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
संदीप गावित यांची पदोन्नती निश्चित
मावळते पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांची कामगिरी अल्प काळात प्रभावी ठरली आहे. ३१ जुलै २०२५ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत त्यांनी आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला. आता त्यांची ‘अपर पोलीस अधीक्षक’ (Addl SP) पदी पदोन्नती निश्चित मानली जात आहे. पुढील दोन दिवसांत त्यांच्या नवीन नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय खबरदारी म्हणून नियुक्ती
नुकतेच नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडली असून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणूक पार पडणार आहे. प्रशासकीय सोय आणि पदभार हस्तांतरण प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी गावित यांच्या बदलीचे आदेश निघण्यापूर्वीच बारबोले यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आगामी काळात भुसावळमधील शांतता व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.





