खेडमध्ये दोन घरफोड्या, ४ लाखांचा ऐवज लंपास
खेड : तालुक्यातील नातूनगर मोहल्ला येथील चोरट्याने बंद घर फोडून तब्बल ४ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी उघडकीस झाली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्ताक सिराज कोंडेकर (वय ४६ वर्षे, व्यवसाय रिक्षा, मूळ रा. नातूनगर मोहल्ला ता. खेड जि. रत्नागिरी सध्या रा. रूम नं. २०२ जबल अलनुर डाक बंगला ता. खेड) यांनी तक्रार दाखल केली असून फिर्यादी यांचे नातूनगर मोहल्ला येथील घरातून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे घराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडून त्यावाटे आत शिरूर घरातील दोन लोखंडी कपाटाचे दरवाजे कोणत्यातरी कठीण हत्यारांनी उघडून कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे २ लाख ६० हजार रु. किमतीचे दागिने तसेच फिर्यादी यांचे चुलत भाऊ तैसिफ मकबूल कोंडेकर यांचे घरातील दोन लोखंडी कपाट तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे १ लाख ४१ हजार ५०० रु. किमतीचे दागिने व रोकड असा तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला.