किशोर सोनवणे खून प्रकरण : ६३ किलोमीटर पाठलाग करुन दोघांना पकडले
महा पोलीस न्यूज । २७ जुलै २०२४ ।जळगाव येथे झालेल्या किशोर सोनवणे खून प्रकरणात फरार असलेल्या दोन मुख्य सूत्रधारांना मालवण – कुंभारमाठ येथे पकडण्यात आले आहेत. ही कारवाई आज शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी तब्बल ६३ किलोमीटर अंतर पाठलाग करीत दोघांना ताब्यात घेण्यात आले. अमोल कोळी (वय ३०) व निलेश सपकाळे (वय ३५) असे दोघांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिंका माता मंदिराजवळ असलेल्या हॉटेल भानूमध्ये पूर्व वैमनस्यातून दि.२२ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास काही तरुणांनी किशोर अशोक सोनवणे या तरुणाची हत्या केली होती. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्ह्यातील ७ आरोपीतांना अटक करण्यात आली असून अद्याप पावेतो ते मॅजीस्टेड कस्टडी रिमांडमध्ये आहेत.
गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी निलु आबा उर्फ निलेश सपकाळे आणि अमोल छगन कोळी हे फरार होते. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोलीस अधिकारी व अमंलदार हे त्याचेवर कायम पाळत ठेवून होते परंतु त्यांना यश मिळत नव्हते. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली व त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करून एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील यांचे पथक तात्काळ सिंधदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी पो.स्टे येथे रवाना केले.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर यांच्या मदतीने जळगाव एलसीबी पथकाने आरोपींचा मागोवा घेतला. दोघे प्रमुख सूत्रधार हे आजगाव येथे लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत होता. परंतु पोलिसांचा सुगावा लागल्यामुळे ते दोघे क्रेटा गाडीने पळून जाण्याचा प्रयत्नात होते. मालवणच्या परिसरात लपलेले असताना कुंभारमाठ येथून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांनी तब्बल ६३ किलोमीटर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
दोघांना गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल तायडे, विजयसिंग पाटील, युनुस शेख, हवालदार सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील हे करीत आहेत. संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्र्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.