शिक्षकदिनादिवशीच किशोर पाटील या शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास.

शिक्षकदिनादिवशीच किशोर पाटील या शिक्षकाने घेतला अखेरचा श्वास
पंकज शेटे अमळनेर I करणखेडा ता- अमळनेर जळगाव ते पुणे-कोल्हापूर परतीचा प्रवास करताना अतिशय दुःखद अंतःकरणाने लिहितोय. ज्या माणसासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आम्हीं भेटायला गेलो तो माणूस त्या सकाळीच निघून गेला होता. आम्हीं तिथे संध्याकाळी पोहोचल्यानंतर कळालं की, सर सकाळीच निघून गेले. सर आजारी आहेत म्हणून त्यांना पाहण्यासाठी माझ्या गावापासून म्हणजे पांगिरे ता भुदरगड जि कोल्हापूर येथून दुपारी ३ वाजता मी आणि माझी थोरली बहीण बाहेर पडलो गाड्या बदलत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.:३० वाजता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील करणखेडा या गावी पोहोचलो. तिथे पोहोचण्यासाठी तब्बल २७ तास ३० मिनिटांचा हा प्रवास करताना फक्त मनात एकच आस होती की,ज्यांच्याबरोबर आजपर्यंत फक्त फोनवर बोलणं व्हायचं त्या सरांना एकदा जवळून प्रत्यक्षात पाहता येईल. ..पण सरांना प्रत्यक्षात पाहणं आमच्या नशिबातच नव्हतं..आम्हीं पोहोचण्याच्या अगोदरच सर या जगातून निघून गेले होते.आम्हीं पोहोचलो आणि समोर सरांचा मुलगा पारसला बघून मनाला धक्काच बसला..त्याच्या डोक्यावरचे केस उतरवले होते..ते बघूनच आम्हाला सगळं कळालं. त्याचे मामा पुढे आले आणि म्हणाले…”सर पारस पोरका झाला..” तेव्हा तर मला काहीच बोलायचे सुचेना..
किशोर पाटील सर एक हुशार, संवेदनशील आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व. सर नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एका महाविद्यालयात २०११ पासून प्राध्यापक होते. पण पगार नव्हता. गेली १५ वर्षें त्यांनी विनावेतन म्हणजे शासनाचा १ रु.या ही न घेता अध्यापनाचे काम केले. अनेक वर्षे झाली पगार नाही, घर कसे चालवायचे..? कुटूंबाचे कसे व्हायचे..? या विवंचनेतून अथवा ताणतणावातून सरांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. एक तर पगार नाही घरची तुटपुंजी शेती, घरी वयोवृध्द आई, पत्नी,एक लहान मुलगा असे कुटूंब.मुळात पगार नाही पुन्हा त्यात हे आजरपण सुरू झाले. घरातली कर्ती व्यक्तीच अशी अंथरुणाला खिळल्यावर काय करायचे..? उपचारासाठी लाखों रुपयांचा खर्च येणार होता.
जन्मदात्रीने किडनी दिली आणि ५ सप्टेंबर २०१८ रोजी किडणी प्रत्योरोपण शस्त्रक्रिया झाली आणि शिक्षकदिनाला त्यांचा नवा पुनर्जन्म झाला. हा खर्च त्यावेळी सुमारे १३ लाखांच्या घरात आला. अशावेळी या आजाराच्या येणाऱ्या उपचारासाठी सरांच्या विद्यार्थ्यांनी हातात कटोरा घेऊन भीक मागून निधी गोळा केला.. ही बातमी लोकमत पेपरमध्ये बघून मी सरांच्या संपर्कात आलो. आणि मग पुढे मी ही सरांची ही संघर्षकहाणी लिहून मदतीचे आवाहन केले होते. त्याला धुळ्यातील ‘ एकला चलो रे’ या साप्ताहिकात प्रसिद्धी मिळाली. पुढे जाऊन मी जेंव्हा विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नावर विनाअनुदानित संघर्षगाथा हे पुस्तक लिहिले यात सविस्तरपणे सरांची व्यथा मांडली त्यामुळे पुस्तकातुन सरांची ही व्यथा अवघ्या महाराष्ट्रभर गेली.
अशाप्रकारे लेखणीच्या माध्यमातून किशोर सर मला जोडले गेले व ते माझे जिव्हाळ्याचे मित्र, एक मार्गदर्शक झाले होते. याच्याही पुढे जाऊन बंधूतुल्य प्रेम आमच्यात निमार्ण झाले होते. एका वेदनेला शेकडो किलोमीटरवरच्या माणसांच्या संवेदनांची नाळ जोडली.त्याला कारण सरांचा स्वभाव..इतका मृदू ,मुलायम आणि लाघवी होता की, आमच्यात घरच्यासारखे संबंध निर्माण झाले. माझ्या मित्र परिवारात व घरात ही सरांच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. . फोनवरून बोलताना त्यांचे ते मृदू शब्द..”.सर जी…” या शब्दाने होणारी सुरुवात अगदी प्रत्येक शब्दांतून त्यांची आत्मीयता प्रकट व्हायची.माझ्या प्रत्येक लिखाणाला सरांची भरभरून दाद मिळायची. हिंदी विषयावर सरांचे प्रभुत्व होते त्यांना एका संस्थेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार ही मिळालेला होता…हिंदी विषयाच्या लेखनात मी सरांचे मार्गदर्शन घ्यायचो.
वरचेवर मी फोन करून सरांची तब्येतीविषयी विचारायचो. सरांना त्रास होत असायचा पण त्यातून ही ते सकारात्मक बोलायचे..स्वतः त्रासात असून देखील इतरांना प्रेरणा मिळेल अशी त्यांची रसाळ वाणी होती. गेले काही महिने त्यांची तब्येत अधिकच खलावलेली होती. सरांच्या किडण्या पुन्हा निकामी होऊन सरांना न्यूमोनिया झाला होता. दवाखान्यात उपचार सुरू होते. आम्हाला सरांना भेटायला जायचे होते पण मंध्यतरी गणपतीचा सण आल्याने नंतर जाण्याचे ठरवले. पण त्याअगोदर माझ्या बहिणीशी फोनवरून बोलताना ते म्हणाले होते “आक्का आता आपल्या हातात काय नाही, तुम्ही देवाला प्रार्थना करा मी बरा व्हावा म्हणून…” हे त्यांचं शेवटचं बोलणं ठरलं.
४ सप्टेंबरला सरांना भेटण्यासाठी आम्हीं दोघे बहीणभाऊ बाहेर पडलो. पण सरांची गाठभेट काही पडली नाही. आम्हीं प्रवासात असतानाच दुसऱ्याच दिवशी सकाळी ५ सप्टेंबर रोजी किशोर सर निघून गेले. आणि “सर जी…” या प्रेमळ हाकेला मी पोरका झालो.मला वाटतं माझे वडीलबंधुचं गेले. सरांच्या घरातून निघताना पारस या आपल्या मुलासाठी सरांनी लिहिलेल्या प्रेमळ पत्राचा फोटो मारून घेतला आणि एस.टी तुन परतीचा प्रवास करताना ते पत्र वाचत होतो. माझी बहीणही ते ऐकत होती..त्या प्रेमळ शब्दांची आपल्या लेकरावरील पाखर वाचून आम्हीं सद्गदीत झालो. इतकं काही आपल्या लेकरासाठी मांडून ठेवलंय बापानं की, वाचताना अक्षरशः गहिवर आणणारं असं ते पत्र. सरांना वाचवण्यासाठी सरांच्या पत्नीने शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केलेत. ना अंगावरच्या दागिन्यांकडे ना स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्यांनी लक्ष दिलं. रात्रंदिवस सरांची सेवा करणं हेचं त्याचं व्रत ठरलेलं होतं. सरांचे दोन मेव्हणेही अतिशय खंबीरपणे आपल्या बहिणीच्या कपाळावरचं कुंकू वाचवण्यासाठी धडपडत होते.
काय योगायोग आहे बघा ना…आठ वर्षांपूर्वी शिक्षक दिनाला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. आणि कालच्या शिक्षक दिनाला सरांचे निधन झाले आणि सरांचा विषय हिंदी त्या दिनाला त्यांचे उतरकार्य येते. म्हणजे शिक्षकीपेशाशी अतिशय प्रामाणिक राहिलेला माणूस शेवटी हा दुर्दवी योगायोग साधून गेला..शेवटी पगाराची आशा मनात ठेवून गेले सर…सरांची केस औरंगाबाद उच्च न्यायालयात खूप वर्षांपासून प्रलंबित आहे…मला म्हणायचे ” केसचा निकाल लागला तर माझे सगळे प्रश्न सुटतील. सर माझा पगार सुरू होईल.”. पण शेवटपर्यंत काहीचं झाले नाही,
शेवटी माणूस गेला पण त्याला न्याय काही मिळाला नाही…म्हणजे या व्यवस्थेत माणूस जिवंत असताना न्याय मिळेल की नाही याची शाश्वती नाही.. गेली १५ वर्षे विनावेतन काम करूनही सरांचा हक्काचा पगार त्यांना मिळाला नाही…आज त्यांचे कुटूंब उघड्यावर आले..ना शासनाने.. ना त्या न्याय देवतेने कुणीच त्यांची दखल घेतली नाही. त्यांना जिवंत असताना न्याय मिळाला नाही आणि म्हणून आयुष्यभर पगाराची आशा करायला लावणाऱ्या या शासन आणि न्याय व्यवस्थेचा शिक्षक दिनाला आपला देह ठेवून या विद्यार्थीप्रिय शिक्षकाने निषेधच नोंदवला आहे…असं म्हणायला हरकत नाही.
सरांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना…भावपूर्ण श्रद्धांजली.💐
किरण सुभाष चव्हाण






