कोठली आरोग्य उपकेंद्र रामभरोसे; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कोठली आरोग्य उपकेंद्र रामभरोसे; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कोठली गावातील आरोग्य उपकेंद्र सध्या चर्चेचा विषय बनले आहे. हे उपकेंद्र कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असले तरी येथे प्रशासनाचा कोणताही वचक नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कर्मचारी मनमानी करत असून, रुग्णसेवा विसरली गेली आहे.
स्थानिकांच्या मते, या उपकेंद्रात रात्री कोणताही कर्मचारी थांबत नाही. तीन-चार कर्मचारी असतानाही उपकेंद्र कायम बंदच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक शोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून हे उपकेंद्र उभारले, त्याचा उद्देश गोरगरीब रुग्णांना वेळेवर सुविधा मिळाव्यात हा होता. मात्र, सद्यस्थितीत परिस्थिती याच्या विपरीत आहे.
विशेष म्हणजे, या उपकेंद्रातील CHO (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) हे भडगाव येथे राहतात, तर आरोग्य सेविका चाळीसगाव येथे वास्तव्यास आहेत. नियमानुसार आरोग्य सेविकेला उपकेंद्रात राहणे बंधनकारक आहे, मात्र त्या रात्री येथे राहत नाहीत. अशा परिस्थितीत एखाद्या वेळी प्रसूतीसाठी रुग्ण आल्यास त्याने कुठे जावे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागातील अनेकांना खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आर्थिक क्षमता नसते. त्यामुळे हे उपकेंद्र सुरळीत चालावे, यासाठी कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी कोठली ग्रामस्थांकडून केली जात आहे.