मोठी बातमी : हॉटेलमध्ये सुरू होता कुंटनखाना, बांगलादेशी तरुणीसह चौघांना पकडले, एकीची सुटका
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ असलेल्या दोन हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याने पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, एका बांगलादेशी तरुणीला देखील पोलिसांनी अटक केली असून ती बेकायदा वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ हॉटेल चित्रकूटमध्ये कुंटनखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच पथक रवाना केले. पंच आणि नकली ग्राहकाच्या मदतीने पथकाने पडताळणी केली असता ते खरे ठरले. तसेच कारवाईत जवळच असलेल्या हॉटेल यशमध्ये देखील एक महिला असल्याची माहिती मिळाल्याने तिथे खात्री केली असता एक महिला आढळून आली.
पोलीस पथकाने हॉटेल चित्रकूटमध्ये एक डमी ग्राहक पाठविला व त्यास काही आढळल्यास मिस कॉल देण्यास सांगितले. त्यानुसार डमी ग्राहकाने मिस कॉल दिला व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि गणेश वाघ, उपविभागीय कार्यालयाचे पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, पोकॉ गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील, सोनाली चव्हाण गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर या पथकाने तेथे छापा टाकला असता काउंटरवर नीलेश गुजर व चेतन माळी आढळले. त्यांची अंगझडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेले १५०० रुपये, मोबाईल आढळले. हॉटेलमधील एका खोलीत डमी ग्राहक व एक महिला आढळली.
पोलिसांनी हॉटेल चित्रकूटमध्ये आढलेल्या महिलेची चौकशी केली असता हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय सखाराम तायडे याच्यामार्फत ती येथे आल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. तसेच तिच्या सोबत असलेली दुसरी महिला हॉटेल यशमध्ये असल्याचे सांगितले. तेथून व्यवस्थापक विजय तायडे याच्यासह एका तरुणीला ताब्यात घेतले. ती तरुणी बांगलादेशी असल्याचे आढळून आले. बांगलादेशी तरुणीकडे कोणतेही दस्ताऐवज आढळून आले नाही.
हॉटेल यशचा व्यवस्थापक विजय तायडे याच्याशी बांगलादेशी तरुणीचा संपर्क झाला व देहव्यापारातून तिला पैसे दिले जाणार असल्याचे सांगून तिला येथे आणले असल्याची माहिती सदर तरुणीने पोलिसांना दिली. तिच्याजवळ एक मोबाईलही आढळून आला. याप्रकरणी पोकॉ गोपाल पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नीलेश गुजर, चेतन माळी, विजय तायडे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बांगलादेशी तरुणीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी देखील अनेक हॉटेलमध्ये कुंटणखाना सुरू असल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना अवैध धंद्याबाबत माहिती असून देखील ते त्याकडे दुर्लक्ष करतात. नुकतेच अधिवेशनात देखील आ.एकनाथराव खडसे यांनी अवैध धंद्याबाबत प्रश्न मांडला होता. एमआयडीसीतील काही कर्मचाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याने ते ठाण मांडून आहेत.