गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाने संपविले जीवन

गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाने संपविले जीवन
कुसुंबा येथील घटनेने परिसरात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कुसूंबा गावात गुढीपाडव्याच्या दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) असे मृत तरुणाचे नाव असून, तो एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत होता. गुढीपाडव्याच्या संध्याकाळी तो घरी परतल्यानंतर काही वेळाने वरच्या खोलीत गेला आणि गळफास घेत आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगावच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.