दुर्दैवी! पाणी भरताना विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथे पाणी भरण्यासाठी मोटारीची पिन लावत असताना विजेचा धक्का लागून एका 39 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लताबाई भाऊसाहेब पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. घराच्या मागील बाजूस त्या पाण्याच्या मोटारीला पिन लावत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्या खाली पडल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ पातोंडा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती तारकेश्वर पांडुरंग गांगुर्डे यांनी पोलिसांना दिली. सध्या हेडकॉन्स्टेबल विजय भोई या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. घरातील विजेची उपकरणे वापरताना योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.