एलसीबीने पकडल्या चोरीच्या १४ दुचाकी, १९ सायकल, तुमची तर नाही ना?
महा पोलीस न्यूज । २७ जुलै २०२४ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी आणि सायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला एलसीबीच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे. शहरात अनेक ठिकाणी पथक तैनात करुन सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून १४ दुचाकी, १९ सायकल हस्तगत केल्या आहेत.
जळगाव जिल्हयांत मोठया प्रमाणात मोटार सायकल व सायकल चोरीचे गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर रामदास अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण शेलार, दिपक चौधरी यांचे पथक तयार करुन त्यांना मोटार सायकल व सायकल चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपीतांबाबत माहिती काढून त्यांचा शोध घेवून गुन्हे उघडकिस आणण्याचा सुचना दिल्या होत्या.
सापळा रचून केली अटक
पथकाने जळगाव शहरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बघून त्याप्रमाणे रेकॉर्डवरील आरोपी अमोल बेलप्पा आखाडे रा.खेडी ता.जळगाव हा दिसत असल्याने त्याचे ठाव ठिकाणाची माहिती काढली. पथकाने त्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून त्यास दि.२५ रोजी शिताफिने ताब्यात घेतले. त्यास मोटार सायकल व सायकल चोरीबाबत कसून विचारपुस करता त्याने जळगाव शहरातील एकूण १४ मोटार सायकल व १९ सायकल चोरी केल्याचे सांगितले. सर्व मोटार सायकली या भुषण जगन्नाथ माळी व विशाल विश्वनाथ माळी दोन्ही रा.वरणगाव ता.भुसावळ यांना दिल्या असल्याचे त्याने सांगितले.
जळगावसह इतर जिल्ह्यात केली चोरी
पथक संशयीत आरोपी बेलप्पा आखाडे यास वरणगाव येथे घेवून गेले असता भुषण जगन्नाथ माळी वय-४० व विशाल विश्वनाथ माळी वय-२८ दोन्ही रा.वरणगाव यांच्याकडून १४ मोटार सायकली व एकूण १९ सायकल असा एकूण ५ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीताला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीने जळगाव शहरासह इतर जिल्ह्यात देखील दुचाकी चोरी केल्या आहेत.