धरणात पोहण्यासाठी उतरले आणि दोघांचा मृत्यू; लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात दुर्दैवी घटना

धरणात पोहण्यासाठी उतरले आणि दोघांचा मृत्यू; लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात दुर्दैवी घटना
लोणावळा (प्रतिनिधी): रविवारची सुट्टी असल्याने फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या आनंदात शोककळा पसरली, कारण भुशी डॅम परिसरात फिरायला गेलेल्या लोणावळ्यातील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे खोल गेले आणि बुडाले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यात वास्तव्यास असलेल्या मित्रांचा एक ग्रुप रविवारी भुशी डॅम परिसरात सहलीसाठी गेला होता. फिरताना डॅममधील पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला आणि सर्वजण पाण्यात उतरले. पोहत असताना साहिल अश्रफ अली शेख आणि मोहम्मद जमाल हे दोघे खोल पाण्यात गेले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले.
इतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र मदत पोहोचण्याआधीच दोघेही पाण्यात बुडाले. घटनास्थळी लोणावळा पोलीस, आपत्कालीन पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाली. त्यांच्या शोधमोहिमेनंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
मृत तरुण मूळ उत्तर प्रदेशातील असून लोणावळ्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.