
महा पोलीस न्यूज । दि.२६ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात लंपी स्किन डिसीज (LSD) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एरंडोल तालुक्यातील टोळी खुर्द शिवारात आज प्रत्यक्ष भेट देऊन लंपी बाधित जनावराची पाहणी केली. या शिवारातील एका शेतकऱ्याच्या १७ महिन्यांच्या वळूला लंपीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या गोठ्याला भेट देत पशुपालकास जनावराचे विलगीकरण, योग्य पौष्टिक आहार, स्वच्छता व गोठा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या दौऱ्यात जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. प्रदीप झोड उपस्थित होते.
जिल्ह्यातील लंपी प्रादुर्भावाची स्थिती
पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उप आयुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजbअखेर जिल्ह्यात लंपी स्किन डिसीजचे एकूण ५७ एपिसेंटर आढळून आले असून, एकूण २६५ जनावरे बाधित आहेत. त्यामध्ये ६३ जनावरे उपचारानंतर पूर्णपणे बरे झाली आहेत, तर १२ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सद्यस्थितीत १९० जनावरे उपचाराधीन असून त्यांच्या योग्य काळजीसाठी प्रशासन सज्ज आहे.
सतर्कतेचे निर्देश व प्रतिबंधात्मक उपाय
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकरी व पशुपालकांनी जनावरांमध्ये लंपीची लक्षणे आढळताच तात्काळ शासकीय पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही खाजगी वैद्यकीय पदविकाधारकांनी परस्पर उपचार करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाधित तालुक्यांमध्ये सार्वजनिक चराई, जनावरांची वाहतूक व पाणीहौद वापरावर निर्बंध लागू करण्यात आले असून, कीटक निर्मूलनासाठी ग्रामपंचायतींमार्फत फवारणीसह स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे समन्वय साधून जनावरांचे प्राण वाचवण्यासाठी तात्काळ आणि काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.