OtherSpecial

महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : ..अखेर जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

१०० किलोवॉटचे क्षमतेचा प्रकल्प : दोन वर्षापासून प्रकल्प होता धूळ खात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पर्यावरणाचे रक्षण आणि वीज बचतीचा संदेश देत जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाने सौर ऊर्जेकडे पाऊल टाकले आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या प्रयत्नाने कार्यान्वित करण्यात आलेल्या १०० किलोवॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. पोलीस अधीक्षक कार्यालयावर दिड वर्षापासून सोलर पॅनल धुळखात असल्याचे वृत्त मे महिन्यात महा पोलीस न्यूजने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली आणि गुरुवारी तो कार्यान्वित करण्यात आला.

राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयात वीज पुरवठा करण्यासाठी आणि बिलाच्या बचतीसाठी काही वर्षापूर्वी सोलर पॅनल बसविले होते. जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयावर देखील याचप्रकारे दोन वर्षापूर्वी सोलर पॅनल बसवण्यात आले होते. सोलर पॅनल लावल्यानंतर देखील दीड वर्ष तो प्रकल्प सुरु करण्यात आलेला नव्हता. पोलीस अधीक्षक कार्यालयाचे विद्युत बिल थकीत असल्याचे कारण देत पुढील कार्यवाही महावितरणकडून करण्यात येत नव्हती. एप्रिल महिन्यात पोलीस प्रशासनाने सर्व बील अदा केले तरीही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. महा पोलीस न्यूजने याबाबत मे महिन्यात वृत्त प्रकाशित केले होते.

पोलीस प्रशासनाने दिली गती
महा पोलीस न्यूजतर्फे वृत्त प्रकाशित करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तातडीने याबाबत माहिती घेतली आणि पुढील पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी महावितरण विभाग, मक्तेदारसह संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही सुरू केली. नियमीत पाठपुरावा करून त्रुटी दूर केल्यावर अखेर सर्व मार्ग मोकळा झाला आणि सोलर उर्जा निर्मिती प्रकल्प सुरू झाला.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि गरज
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि उपविभागीय कार्यालय अशा अनेक महत्त्वाच्या शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखा पूर्णपणे संगणकीकृत असल्याने येथे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. विजेचा मासिक वापर अंदाजे १०,००० ते ११,००० युनिट्स असतो. प्रकल्पाची व्याप्ती: कार्यालयाच्या छतावर सुमारे ४ ते ५ हजार स्क्वेअर फूट जागेत १८४ सोलर प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. वीज निर्मिती प्रकल्पामुळे दिवसाला किमान ३०० युनिट्स, तर उन्हाळ्यात ४०० ते ४५० युनिट्स पर्यंत वीज निर्मिती होणे अपेक्षित आहे.

वीज बिलात होणार मोठी बचत
‘सनस्ट्रोट ग्रीन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ (Sunstroat Green Technology Pvt Ltd) कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलाचा वीज बिलावर होणारा मोठा खर्च वाचणार असून, गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज ‘नेट मीटरिंग’द्वारे ग्रीडला पुरवली जाणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक (गृह) आव्हाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, जिल्हा विशेष शाखेचे सतीश गोराडे आणि राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button